रत्नागिरी शहरात सीएनजीचा तुटवडा

रत्नागिरी : रत्नागिरी शहरात गेल्या आठवड्यापासून सीएनजीचा मोठा तुटवडा जाणवत आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून परिस्थिती अधिक गंभीर बनल्याने वाहनचालक आणि विशेषतः रिक्षाचालक पुरते हैराण झाले आहेत. ऐन उन्हाळी सुट्ट्या आणि लग्नसराईच्या काळात पर्यटकांची मोठी गर्दी शहरात असताना सीएनजीच्या कमतरतेमुळे त्यांनाही गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

शहरातील तीन सीएनजी पंपांवर पुरेसा पुरवठा नसल्याने वाहनचालकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. काही पंपांवर तर कमी दाबाने सीएनजी मिळत असल्याने चालकांना पुरेसा गॅस भरण्यासाठी अधिक वेळ खर्ची करावा लागत आहे. याचा थेट परिणाम रिक्षाचालकांच्या व्यवसायावर होत आहे. धंद्याच्या वेळी सीएनजी मिळत नसल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.
दूरदूरहून रत्नागिरीत फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांनाही सीएनजीच्या प्रतीक्षेत बराच वेळ वाया घालवावा लागत आहे. यामुळे रत्नागिरीती पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटकांमध्ये नाराजी पसरली आहे.

या गंभीर परिस्थितीमुळे त्रस्त झालेल्या रिक्षाचालक-मालकांनी आता आंदोलनाचा विचार सुरू केला आहे. जर सीएनजीचा पुरवठा सुरळीत झाला नाही, तर मोठे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

त्यामुळे जिल्हाधिकारी, पुरवठा अधिकारी आणि तहसीलदारांनी या गंभीर विषयावर तातडीने लक्ष देऊन रत्नागिरी शहरातील सीएनजीचा तुटवडा दूर करावा, अशी मागणी रिक्षाचालक आणि वाहनचालकांकडून करण्यात येत आहे. सीएनजी वेळेवर न मिळाल्यास बँकेचे हप्ते कसे भरायचे या तितंत्चनेत रिक्षाचालक-मालक आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:09 PM 07/May/2025