रत्नागिरी : रत्नागिरीकरांनी बुधवारी शून्य सावली हा खगोलीय आविष्कार अनुभवला. दुपारी १२ वाजून ३३ मिनिटांनी हा आविष्कार घडला. अनेकांनी उन्हात उभे राहून, वस्तू ठेवून सावली पडत नसल्याचा अनुभव घेतला.
हा आविष्कार अनुभवण्यासाठी दुपारी एखादी वस्तू उदा. अपारदर्शक बाटली, काठी जमिनीला बरोबर काटकोनात उभी ठेवून पाहिली. दुपारी १२.३३ वाजता तिच्या बुडाशी सावली गायब झालेली दिसली.
या संबंधी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील प्राध्यापक व खगोलप्रेमी बाबासाहेब सुतार यांनी सांगितले की, इतर दिवशी रोज दुपारच्यावेळी सूर्य कधीच डोक्यावर नसतो. तो थोडा उत्तरेकडे किंवा थोडा दक्षिणेकडे सरकलेला असतो. पृथ्वीवर + २३.५ आणि -२३.५ अंश अक्षांशदरम्यानच्या ठिकाणांसाठी, सूर्याची अवकाशातील क्रांती (सूर्याचे खगोलावरील स्थान सांगणारा एक निर्देश बिंदू) दोनदा त्या ठिकाणांच्या अक्षांशाच्याएवढी असते. एकदा उत्तरायणादरम्यान आणि एकदा दक्षिणायनादरम्यान या दोन दिवशी सूर्य दुपारच्या (मध्यान्ह) वेळी अगदी डोक्यावर असतो आणि जमिनीवर वस्तूची सावली पडत नाही, यालाच शून्य सावली म्हणतात. दक्षिण भारतात सर्वत्र शून्य सावली अनुभवता येते. रत्नागिरीप्रमाणेच सांगली, मिरज, राजमुंद्री या ठिकाणीही दिवशी शून्य सावली अनुभवता येऊ शकते. ५ ऑगस्टला पुन्हा हीच खगोलीय घटना पाहता येईल; पण पावसाळा असल्यामुळे या घटनेपासून बहुतेकवेळा रत्नागिरीकर वंचित राहतात.
असा दिवस पृथ्वीवर +२३.५° आणि -२३.५° अंश(किंवा २३.५° उ. आणि २३.५°द.) अक्षांश दरम्यानच्या ठिकाणी दरवर्षी दोनदा अनुभवता येतो. या दोन दिवशी सूर्य दुपारच्या (मध्यान्ह) वेळी त्या ठिकाणी अगदी डोक्यावर येतो आणि जमिनीवर वस्तूची सावली पडत नाही. रत्नागिरीचे अक्षांश + १६.९८ उ. आणि रेखांश ७३. ३ पू. असल्याने ही घटना अनेकांनी पाहिली. – प्रा. बाबासाहेब सुतार, रत्नागिरी.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:57 08-05-2025














