तावडे अतिथी भवन : कोकणातील पर्यटनाचा मानबिंदू

आडिवरे (ता. राजापूर) येथील तावडे अतिथी भवनाचा सातवा वर्धापनदिन १०-११ मे २०२५ रोजी थाटात साजरा होत आहे. याचवेळी श्री सप्तकोटेश्वर मंदिराचे भूमीपूजन १० मे रोजी होणार आहे. क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळाने २०१५ मध्ये उभारलेली ही वास्तू दीड एकरवर १०,००० चौरस फुटांवर पसरली आहे. जांभ्या दगड आणि मेंगलोरी कौलांनी सजलेली ही तीनमजली वास्तू राजस्थानी शैलीत नजरेत भरणारी आहे.

ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व
तावडे हे राजस्थानच्या राजपूत घराण्याचे वंशज असून, ८०० वर्षांपूर्वी आडिवरे येथे त्यांची वस्ती होती. श्री सप्तकोटेश्वर या कुलदैवताची विशाल मूर्ती भवनात स्थानापन्न आहे. आडिवरे येथील श्री महाकाली मंदिरातही तावडेंचा मान आहे. कोकणातून स्थलांतरित झालेले तावडे कुटुंबीय पुन्हा गावाकडे परतत असल्याने भवनाला विशेष महत्त्व आहे.

पर्यटन आणि सुविधा
आठ आलिशान एसी सूट्स, उद्यान आणि प्रशस्त पार्किंगसह तावडे भवन पर्यटकांचे आकर्षण आहे. शुद्ध शाकाहारी भोजन आणि शांत वातावरणामुळे येथे मुंबई, पुणे, दिल्ली, युएस, युके, ऑस्ट्रेलियासह परदेशातील पर्यटक येतात. मुंज, साखरपुडा, डेस्टिनेशन वेडिंग, सेमिनार आणि प्रशिक्षणासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. २५०-३०० लोक बसतील अशी व्यवस्था आणि मोठ्या कार्यक्रमांसाठी १,२०० लोकांचा स्टेज आहे.

पर्यटनस्थळांच्या जवळ
गणपतीपुळे ते मालवणच्या मध्यावर असलेले तावडे भवन देवघळी बीच, श्री कनकादित्य मंदिर, श्री महाकाली मंदिर, स्वामी स्वरूपानंद मंदिर आणि श्री गणेश मंदिराच्या जवळ आहे. स्वच्छता, तत्पर कर्मचारी, सुरक्षित वातावरण आणि पौष्टिक भोजनामुळे पर्यटक येथे पुन्हा येतात. फोटो शूट आणि चित्रीकरणासाठीही हे ठिकाण लोकप्रिय आहे.

मान्यवरांच्या भेटी
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गायक प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन-लघाटे यांच्यासह अनेक मान्यवरांनी भवनाला भेट देऊन कौतुक केले. टीव्ही मालिकांचे चित्रीकरणही येथे झाले आहे. आमदार, मंत्री, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांनीही भेटी दिल्या.

भविष्यातील योजना
भवनाचा दुसरा टप्पा सुरू असून, श्री सप्तकोटेश्वर मंदिर उभारणीला प्राधान्य आहे. पर्यटकांच्या मागणीनुसार स्वीमिंग पूल आणि इनहाऊस किचनच्या सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहेत. तावडे भवन कोकणातील पर्यटनाचा मानबिंदू म्हणून आपले स्थान आणखी भक्कम करत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:19 10-05-2025