veteran Bollywood Actor Ramakant Dayama Passes Away: सिनेविश्वातून एक दु:खद बातमी समोर आली आहे.चित्रपट, दूरदर्शन आणि अनेक जाहिरातींमधून घराघरात पोहोचलेले ज्येष्ठ अभिनेते रमाकांत दयामा यांचं निधन झालं आहे.
आज २६ मे रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली असून चाहत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
अभिनेत्री शुभांगी लाटकर यांनी सोशल मीडियावर ज्येष्ठ अभिनेते रमाकांत यांच्या निधनाची बातमी शेअर केली आहे.तसंच त्यांनी सोशल मीडियावर रमाकांत यांचा एक जुना व्हिडिओ शेअर करत रमाकांत दयामा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. अभिनेत्री शुभांगी यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर भावुक पोस्ट शेअर करत लिहिलंय,”आज आपण एक खूप सुंदर आत्मा गमावला आहे आणि मी पूर्णपणे निःशब्द झाले आहे.”
पुढे त्यांनी म्हटलंय,” रमाकांत दयामा हे माझे केवळ चांगले आणि कौटुंबिक मित्रच नव्हते, तर एक अशी व्यक्ती होते ज्यांच्याबद्दल मला खूप आदर आणि कौतुक वाटत असे. आव्हानाला न जुमानता आयुष्याचा आनंद कसा घ्यायचा हे त्यांना खऱ्या अर्थाने माहीत होते. एक उत्तम डान्सर, उत्तम गायक आणि एक उत्कृष्ट अभिनेता आणि माझ्यासाठी ते मार्गदर्शक होते. ते उंचीने कमी होते मात्र, मला ओळखीच्या लोकांपैकी ते सर्वात खमके आणि अत्यंत धाडसी व्यक्तिमत्व होतं.ते कित्येक महिन्यांपासून आजारी होते हे आम्हा सर्वांना माहीत असूनही, आमच्या मनात कुठेतरी आशा होती. आमची अनेक स्वप्न अपूर्ण राहिली.इतक्या वर्षांनंतर, मला त्याच्यासोबत पुन्हा काम करण्याची खूप इच्छा होती.”
आम्ही एकत्र एक सुंदर हिंदी नाटक करायचं ठरवलं होतं. जेव्हा मी त्यांना विनंती केली, तेव्हा ते हसून म्हणाले, “मी लवकर बरा होऊ दे.” आम्ही एकत्र रंगमंचावर निवडक सुंदर कविता सादर करण्याची असंही ठरवलं होतं. ते स्वप्नही आता अपूर्णच राहिलं आहे.काही दुःख अशी शांतता मागे सोडतात, जी शब्दांत व्यक्त करता येत नाही.आजचा दिवस तसाच काहीसा आहे. रमाकांतजी, तुमची खूप आठवण येईल. तुमची कला आणि तुमचा सुंदर आठवणी कायम हृदयात सदैव जिवंत राहतील.” अशी भावुक पोस्ट त्यांनी लिहिली आहे.
अभिनेते रमाकांत दयामा यांनी त्यांच्या अभिनय शैलीने अनेकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं होतं.’चक दे इंडिया’, ‘राम सेतू’, ‘स्कॅम १९९२: द हर्षद मेहता स्टोरी’ ,’शुद्ध देसी रोमान्स’, ‘बनारसी’ आणि ‘हमशकल’ यांसारख्या अनेक हिंदी चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम करून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यांच्या निधनाची बातमी समजताच इंडस्ट्रीतील कलाकार शोक व्यक्त करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:34 26-05-2026














