रत्नागिरी : रत्नागिरी शहर जिल्ह्यात मार्च २०२४ ते मार्च २०२५ अखेर आतापर्यंत तब्बल ५ हजार ४१० नागरिकांना भटक्या, पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. यामध्ये एकाही नागरिकाचा मृत्यू झालेला नाही. मागील काही महिन्यांपासून विविध शहरांतही कुत्र्याने चावा घेतल्याच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून रत्नागिरी शहर, जिल्ह्यातील पिसाळलेल्या व मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी रत्नागिरीकरात होत आहे.
शहरातील विविध भागांत काही महिन्यांपासून मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. ही कुत्रे झुंडीने फिरत असल्यामुळे चिमुकले, ज्येष्ठ नागरिक, पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मार्चअखेर तब्बल ५ हजारांहून अधिक नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कुत्र्यांनी चावा घेतल्यामुळे जिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय आणि नगर परिषदेच्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी नागरिक जात आहेत.
कित्येक शहरात एकटे जात असताना चिमुकले, विशेष तरुणी, महिलांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याचा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला होता. रत्नागिरी शहरातही मोकाटा कुत्र्यांचा वावर वाढत चालला आहे. कचरा नियमित उचलला जात नसल्याने त्यावरील कुजलेल्या अन्नपदार्थांवर भटके कुत्रे ताव मारतात. चिकन, मटण, मासळी बाजारासमोर मोठ्या प्रमाणात मटण पडत असल्यामुळे कुत्रे झुंडीने गर्दी करीत आहेत.
तसेच कचरा असलेल्या ठिकाणी, हॉटेल्स, सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे पालक आपल्या चिमुकल्यांना एकटे बाहेर पडण्यास मज्जाव करीत आहेत तसेच ज्येष्ठ नागरिक वॉकिंगसाठी बाहेर पडताना दहशतीखाली दिसत आहेत. अशा वेळी ज्येष्ठ नागरिक, चिमुकल्यांवर मोकाट कुत्रे हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला
शहरातील साळवी स्टॉप, जे. के. फाईल्स, मारुती मंदिर, कोकणनगर पट्टा, मजगाव, जयस्तंभ, एस. टी. स्टॅन्ड, मांडवी, कारवांचीवाडी, मांडवी, लक्ष्मी चौक, रेल्वे स्टेशन परिसर, विविध धार्मिक स्थळे, भाजीपाला, फळविक्रेते, चहाच्या टपऱ्या, विविध बसस्टॉफ, चित्रपटगृह, नाट्यगृह परिसर, विविध मांसाहारी हॉटेल्स यासह जिल्ह्यातील लांजा, पावस, संगमेश्वर, राजापूर, साखरपा या ठिकाणांसह विविध तालुक्यांत ही मोकाट कुत्र्यांनी मोठी दहशत माजवली आहे.
कुत्र्यांचे निर्बिजीकरण आवश्यकच
मोकाट, भटके व झुंडीने फिरणारी कुत्रे केव्हाही नागरिकांवर हल्ला करण्याची भीती आहे. त्यामुळे मोकाट, भटक्या कुत्र्यांवर नगर परिषद प्रशासनाने तातडीने पकडून त्यांचे निर्बिजीकरण करून त्यांना बाहेर सोडून द्यावे, अशी मागणी वाढत आहे.
रत्नागिरी शहर जिल्ह्यात वर्षभरात ५ हजार ४१० नागरिकांचा कुत्र्यांनी चावा घेतला आहे. सर्वांना उपचारही देण्यात आले आहेत. सिव्हिल व जिल्हा रुग्णालयात रेबीज, अँटीरेबीज सिरम ही मोफत दिली जाते. रेबीज इंजेक्शनचा साठा मुबलक प्रमाणात आहे-डॉ. विकास उमरे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, रत्नागिरी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 AM 10/May/2025
