गुहागर : खड्डे भरण्यासाठी ठेकेदार मिळेना

गुहागर : डिसेंबर २०२४ पासून गुहागर शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांबाबत अनेक निवेदने व उपोषणाचा इशारा देऊनही हे काम पूर्ण झालेले नाही. याबाबत ठेकेदार समोर येत नसल्याने हे खड्डे भरण्याचे काम रखडले असल्याचे उत्तर कार्यकारी अभियंता यांनी दिले आहे.

गेले सहा महिने गुहागर शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील शहरापासून १ हजार ८०० मीटर परिसरातील रखडलेले रस्ता रुंदीकरणाचे काम व या रस्त्यावर पडलेले खड्डे सर्वांनाच डोकेदुखी ठरत होते. मात्र, निवेदने व आंदोलन इशाऱ्यानंतर या ठिकाणचे खड्डे तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात आले आहेत.

आमदार भास्कर जाधव यांनी पत्र देऊन हे खड्डे भरून कार्पेट टाकण्याची मागणी केली होती. खासदार सुनील तटकरे यांनीही राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना या प्रकरणी धारेवर धरले होते. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा दिला होता. शिवसेनेने रास्ता रोको व उपोषणाचा इशारा दिला होता. पालकमंत्री उदय सामंत यांनीही राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंत्यांना रस्त्याची तातडीने डागडुजी करण्यात यावी असा आदेश दिला. मात्र, राष्ट्रीय महामार्गाने या आदेशाकडे दुर्लक्षच केल्याचे दिसून येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:27 AM 10/May/2025