चिपळूणमध्ये गाळमुक्तीसाठी ४० दिवसांचा अॅक्शन प्लॅन

चिपळूण : चिपळूण शहराला पुराच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी आणि नद्यांमधील गाळ काढण्यासाठी प्रांत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ४० दिवसांचा युद्धपातळीवरील कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. या कामात प्रशासनासोबतच नागरिक, व्यापारी आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी सक्रिय सहभाग घेणार आहेत.

शुक्रवारी सकाळी नऊ वाजता चिपळूणचे प्रांत, तहसीलदार, नगरपालिका मुख्याधिकारी, एरिकेशन खाते, यांत्रिकी विभाग आणि बचाव समिती सदस्य तसेच शहरातील प्रतिष्ठित व्यापारी, नागरिक व समाजसेवक यांनी महापुरास कारणीभूत ठरणाऱ्या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीनंतर दुपारी तीन वाजता प्रांत कार्यालयात संबंधित सर्व घटकांची बैठक झाली. यावेळी प्रत्येक ठिकाणच्या सुविधा आणि अडचणींबाबत सखोल चर्चा करण्यात आली. या चर्चेनंतर पुढील ४० दिवसांत गाळ काढण्यासाठीची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली.

या कृती आराखड्यानुसार, काढण्यात येणारा गाळ सर्व जनतेसाठी विनामूल्य जाहीर करण्यात आला आहे. जर कोणाला तीन किलोमीटरच्या आत गाळ टाकायचा असेल, तर शासनाची रॉयल्टी भरून तहसील कार्यालयाच्या परवानगीने तो टाकता येईल. जनतेला गाळ कोठेही नेण्याची मुभा असेल. नागरिक स्वतः डंपर आणून गाळ घेऊन गेल्यास त्यांना कोणतीही रॉयल्टी लागणार नाही, तसेच डंपरमध्ये गाळ भरण्याची सोय शासन करणार आहे. या गाळ मोहिमेत कोणीही अडकाठी निर्माण केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

विशेषतः शिव नदीमधील गाळाचा प्रश्न बैठकीत चर्चिला गेला. शिव नदीतील गाळ काढण्यासाठी डोझरची आवश्यकता असल्याने, यांत्रिकी विभाग तातडीने रविवारपर्यंत डोझर उपलब्ध करून देणार आहे. या डोझरच्या साहाय्याने शिव नदीतील पांग सोन्या मारुती मंदिर ते गांधी बेट समोरील सोन्या मारुती मंदिरपर्यंतचा संपूर्ण गाळ काढला जाणार आहे.

या महत्त्वपूर्ण मोहिमेमध्ये नागरिक, समाजसेवक आणि विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. भविष्यात नगरपालिकेला कायमस्वरूपी गरजेच्या मशिनरी उपलब्ध व्हाव्यात यासाठी आमदार साहेब आणि पालकमंत्री महोदय यांना प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.

येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी ४० दिवसांत गाळ मोहीम युद्धपातळीवर पूर्ण करून प्रशासन आणि नागरिक मिळून येणाऱ्या मान्सूनला धैर्याने सामोरे जातील, असा निर्धार यावेळी करण्यात आला. या मोहिमेसाठी प्रशासन, चिपळूण बचाव समिती आणि समस्त चिपळूणवासीय एकवटले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:21 PM 10/May/2025