जलजन्य आजार टाळण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन

रत्नागिरी : नवजात अर्भक व ५ वर्षा आतील एकूण बालमृत्युपैकी ५ ते ७ टक्के बालमृत्यू हे केवळ अतिसारामुळे होतात. त्यामुळे अतिसार नियंत्रणात आणण्यासाठी ५ वर्षाच्या आतील बालकांचे आशा व आरोग्य कर्मचारी यांच्या मार्फत सर्वेक्षण करून अतिसार असलेल्या बालकांना ओ. आर. एस. (ors) क्षारसंजीवनी प्रात्यक्षिक व झिंक गोळ्या देऊन पालकांना अतिसार नियंत्रणाबद्दल आरोग्यशिक्षण व जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यात दि. 1 जून ते ३१ जुलै २०२५ दरम्यान ग्रामपंचायत विभाग, पाणी गुणवत्ता विभाग, महिला बालविकास विभाग यांच्या समन्वयाने आरोग्य विभागाकडून अतिसार थांबवा (स्टोप डायरिया) मोहीम राबविली जाणार आहे.

या पार्श्वभूमीवर दि.०८/०५/२०२५ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य समिती सभेमध्ये सर्व तालुका आरोग्य अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या. सदर सभेस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध आठल्ये, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे , तसेच आरोग्य विभागाचे जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

जलजन्य आजार टाळण्यासाठी पावसाळ्यापूर्वी काय काळजी घ्यावी याबाबत प्रत्येक ग्रामपंचायत अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या सर्व स्त्रोतांचे टीसीएल द्वारे पाणी शुद्धीकरण करणे, गावातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करणे, पुरेसा टीसीएल पावडर साठा तसेच तो योग्य हवाबंद स्थितीत ठेवणे, नियमित ओ.टी. टेस्ट घेणे या सर्व बाबींचे पर्यवेक्षण करून काळजी घेणे बाबतच्या सर्व सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव यांनी उपस्थित सर्व तालुका आरोग्य अधिकारी यांना दिल्या. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध आठल्ये व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांनी अतिसार थांबवा मोहीमेबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

अतिसार नियंत्रणासाठी हे करा..
पाणी उकळून गाळूनच पिण्यासाठी वापरा. पाणी घेण्यासाठी ओगराळ्याचा वापर करा.
ओ.आर.एस. (ors) क्षारसंजीवनी चा वापर करा.
पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरीन किवा मेडीक्लोर चा वापर करा.
उघड्यावरचे तसेच शिळे अन्नपदार्थ खाऊ नका.
वैयक्तिक स्वच्छता पाळा. उदा. हात धुणे.
नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क करा.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 PM 10/May/2025