नागपूर: देशभरात सातत्याने वाढणारी महागाई आणि वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणाऱ्या ‘नीट’ (NEET) परीक्षेतील कथित पेपरफुटी घोटाळ्यावरून आता नागपुरात राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.
या गंभीर मुद्द्यांवरून केंद्र आणि राज्य सरकारला घेरण्यासाठी नागपूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने आज एक अत्यंत हटके आणि अनोखे ‘मेलोडी आंदोलन’ करण्यात आले.
नागपूरच्या मध्यवर्ती आणि गजबजलेल्या व्हेरायटी चौकात हे आंदोलन पार पडले. नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रफुल्ल गुडधे पाटील यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते भर उन्हाची पर्वा न करता रस्त्यावर उतरले होते. ‘मेलोडी इतनी चॉकोलेटी क्यू है?’ या प्रसिद्ध जाहिरातीच्या ओळींचा वापर करत, देशात महागाई आणि पेपरफुटी एवढी जास्त का आहे?असा खोचक टोला काँग्रेसने या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला लगावला.
नागरिकांना वाटली मेलोडी चॉकलेट्स
या आंदोलनाचे मुख्य आकर्षण म्हणजे, चौकातून जाणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना, वाहनधारकांना आणि प्रवाशांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘मेलोडी चॉकलेट्स’ वाटली. सरकार केवळ आश्वासनांचे ‘गोड चॉकलेट’ जनतेला देत असून प्रत्यक्षात मात्र सर्वसामान्यांची लूट आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करून व्हेरायटी चौक परिसर दणाणून सोडला.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ खपवून घेणार नाही: प्रफुल्ल गुडधे पाटील
यावेळी माध्यमांशी बोलताना काँग्रेस शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडधे पाटील म्हणाले की, “एकीकडे देशातील जनता महागाईने होरपळत आहे, तर दुसरीकडे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य असलेल्या ‘नीट’ परीक्षेचा पेपर फुटतो. सरकार यावर ठोस पावले उचलण्यास अपयशी ठरले आहे. या भ्रष्टाचाराविरोधात आणि वाढत्या महागाईविरोधात काँग्रेस जनतेच्या बाजूने सातत्याने आवाज उठवत राहील. या आंदोलनात युवक काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला आघाडीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अनोख्या आंदोलनाची सध्या नागपूर शहरात जोरदार चर्चा रंगली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:47 23-05-2026














