रत्नागिरी:
तालुक्यातील आरे-बसणी येथे किरकोळ कारणावरून शेजाऱ्यांमध्ये झालेल्या वादातून एका महिलेला शिवीगाळ करत अंगावर धावून जाणे आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत अदखलपात्र (NC) गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार अस्मि अक्षय शिवलकर (वय ३५, रा. आरे बसणी) आणि संशयित आरोपी (शेजारी) यांच्यात गेल्या काही काळापासून सातत्याने वाद होत आहेत. दि. १५ मे रोजी रत्नागिरी येथील तहसीलदार कार्यालयात दोघांमध्ये सुरू असलेल्या ‘चॅप्टर केस’ची तारीख होती. या तारखेसाठी तक्रारदार हजर होत्या, मात्र गैरतक्रारदार बाजूचे लोक हजर नव्हते.
याच कारणाचा राग मनात धरून, तक्रारदार अस्मि शिवलकर संध्याकाळी ६ वाजता घरी परतल्या असता, शेजारी राहणाऱ्या प्रतीक्षा प्रकाश कदम आणि पंकज प्रकाश कदम यांनी त्यांना पाहून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी प्रतीक्षा कदम यांच्या हातात कोयती (धारदार शस्त्र) असल्याची माहिती तक्रारीत दिली आहे.
यानंतर रात्री ८:३० च्या सुमारास तक्रारदार घरी जेवत असताना संशयित आरोपी पुन्हा त्यांचे नाव घेऊन शिवीगाळ करू लागले. तक्रारदार विचारणा करण्यासाठी गेल्या असता, प्रतीक्षा कदम, पंकज कदम आणि प्रकाश कदम यांनी घराचे लाईट बंद करून तक्रारदार यांच्या अंगावर धावून गेले. या झटापटीत अस्मि शिवलकर यांच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि मंगळसूत्र गळून पडले.
कुटुंबियांनी धाव घेतल्याने अनर्थ टळला
हा प्रकार घडत असताना तक्रारदार यांनी आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकून त्यांचे सासरे समीर शिवलकर आणि दीर साहिल शिवलकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नातेवाईक येत असल्याचे पाहून तिन्ही संशयित आरोपींनी घरात पळ काढला आणि “तुम्हाला नंतर बघून घेतो,” अशी जीवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेनंतर अस्मि शिवलकर यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रतीक्षा प्रकाश कदम, पंकज प्रकाश कदम आणि प्रकाश महादेव कदम (सर्व रा. आरे बसणी, रत्नागिरी)
यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३२४(४), ३५१(२), ३५२ आणि ३(५) अन्वये अदखलपात्र गु.रजि. नं. १४४/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
महिला पोलीस हवालदार शिवलकर (बक्कल नं. १४२१) यांनी हा गुन्हा दाखल केला असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलीस हवालदार महाडिक (बक्कल नं. १२४) हे या परिसरातील शांततेसाठी एन.सी. पेट्रोलिंग करत असून पुढील तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
19:45 23-05-2026














