रत्नागिरी शहरात सीएनजीचा तुटवडा

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील सीएनजी पंपावर २ सीएनजीचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे पंपावर लांबचलांब रांगा लागल्या आहेत. याचा सर्वात फटका जिल्ह्यात पर्यटनासाठी येणाऱ्या सीएनजीच्या वाहनांना बसत आहे. त्याचबरोबर रिक्षाचालकही हैराण झाले आहेत. ‘आम्ही फिरायचं कधी आणि गॅस कधी भरायचा’, असा सवाल पर्यटकांनी तर ‘साहेब तुम्हीच सांगा आता आम्ही कसं जगायचं’ असा सवाल रिक्षाचालकांनी उपस्थित केला आहे.

जिल्ह्यात सर्वच पंपांवर सीएनजीचा तुटवडा निर्माण झाला आहे. गेल्या १० दिवसांपासून जिल्ह्यातील परिस्थिथी गंभीर बनली आहे. यामुळे वाहनचालक हैराण झाले आहेत. याचा सर्वाधिक फटका रिक्षाचालकांना बसत आहे. उन्हाळी सुट्टीत पर्यटनासाठी जिल्ह्यात येणार्‍या पर्यटकांनासुद्धा या सीएनजीचा सामना करावा लागत आहे. ज्या पर्यटकांच्या गाड्या सीएनजीवर चालणार्‍या आहेत. त्यांना तासनतास गॅस भरण्यासाठी रांगामध्ये उभे रहवे लागत आहे. यातच त्यांचा वेळ जात आहे. साधारण जिल्ह्यात सर्वच पंपावर किमान २ ते ३ कि.मी. पर्यंत लांबचलांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. यामुळे ४ ते ५ तास गॅस मिळवायला वेळ लागत आहे. काही वेळा नंबर येतो मात्र गॅसच संपतो, अशाही प्रसंगाला वाहनचालकांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे सध्या सर्वच वाहनचालक हैराण झाले आहेत.

वाढत्या पेट्रोलला पर्याय म्हणून अनेकजण सीएनजी पर्याय देत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात सीएनजी वाहनांची विक्री सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. पण असे असले तरीही जिल्ह्यात अजूनही मुबलक सीएनजी पंप उपलब्ध होऊ न शकल्याने वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. जिल्ह्यात रत्नागिरी व चिपळूण या मोठ्या शहरात दोनच पंप आहेत. तर शहरालगत १ पंप आहे. खेडमध्ये २, संगमेश्वरमध्ये ३, लांजात १, राजापूरला १ असे पंप आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:49 10-05-2025