साडवली : शेतमालावर व जंगली भागातील झाडाझुडपांवर वास्तव्य करणारा तसेच सर्वांचा आवडता असा राष्ट्रीय पक्षी मोर याला पावसाच्या आगमनाची चाहुल लागताच तो आपला बहुरंगी पिसारा फुलवून, चुईथुई नाचू लागतो आणि मॅओऽऽ मॅओ अशी साद घालत पाऊस आल्याचे भाकित करतो. असेच काहीसे दृश्य संगमेश्वर तालुक्यातील पुर्ये तर्फे देवळे तुळजापूरवाडी येथील शंकर वैद्य यांच्या घराजवळील परिसरात पहायला मिळाले.
तीव्र उष्म्याने मनुष्याप्रमाणे प्राणी-पक्षी देखील हैराण होतात. ही भावना लक्षात घेऊन येथील वैद्य कुटुंबिय आपल्या घरा शेजारील परिसरात पक्षांसाठी दोन चार ठिकाणी मातीच्या भाड्यात पाणी ठेवतात. हे थंड पाणी पिण्यासाठी आजूबाजुच्या परिसरातील मोर, रानकोंबडी व विविध पक्षी येथे येतात आणि आपली तहान भागवतात.
मनुष्या प्रमाणे पशुपक्षी देखील पावसाची आतुरतेने वाट पाहत असतात. अशावेळी पावसाचे आगमन झाल्यास अनपेक्षितपणे होणारा आनंद व्यक्त करण्याची मनुष्याप्रमाणे पशु-पक्षांची तहा असते. मानवाप्रमाणे पशूपक्षी आणि वनस्पतींनाही झालेला आनंद दडवून ठेवता येत नाही. चेहऱ्यावरुन वा कृतीतून तो निदर्शनास येतोच.
पावसाच्या सरी बरसल्यावर या राष्ट्रीय पक्षाला अत्यानंद होतो. तेव्हा तो त्याचा बहुरंगी पिसारा फुलवून नाचू लागतो. व मॅओऽऽ… मॅओ ओरडत इतरांना पाऊस सुरु झाल्याचे भाकित करतो. असेच दुर्मीळ दृश्य गुरुवारी सकाळी पुर्ये तर्फे देवळे येथील शंकर वैद्य यांचे घराशेजारील परिसरात पहायला मिळाले. हे दुर्मीळ दृश्य वैद्य यांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केले आहे. मोराने केलेल्या भाकितानंतर अर्ध्या तासातच साखरपा, कोंडगाव, पुर्वे या भागात जोरदार पाऊस झाला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:39 PM 12/May/2025
