रत्नागिरी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष सुनील श्री. गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोकअदालत पार पडली. त्यामध्ये ३५ हजार १८१ प्रकरणे निकाली लागली.
न्यायालयामध्ये वर्षानुवर्षे वाद प्रलंबित राहिल्यामुळे त्याचा परिणाम कौटुंबिक व सामाजिक स्वास्थ्यावर पडताना दिसून येतो. काही वेळा न्यायालयीन प्रक्रियेचा वापर विरुद्ध पक्षकाराला त्रास देण्यासाठीसुद्धा केला जातो. वादावर तोडगा निघत नसल्यामुळे वाद प्रलंबित राहून विलंबामुळे न्यायाच्या उद्देशाला तडा जातो. जास्त संख्येने प्रलंबित असलेल्या वादांमुळे न्याययंत्रणेवरसुद्धा ताण येतो. त्यामुळे निर्णय प्रक्रियेला विलंब होतो. केवळ आर्थिक किंवा वेळेचा अपव्यय तेवढ्यापुरताच हा प्रश्न मर्यादित राहिला नसून मानसिक ताण-तणावामुळे होणारी हानी ही पैशाच्या स्वरूपातसुद्धा भरुन काढता येणारी नसते. त्याच पार्श्वभूमीवर लोकन्यायालय म्हणजेच लोकांच्या प्रत्यक्ष सहभागातून वाद निवारण हा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. त्याचा फायदा आज आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये हजारो पक्षकारांनी घेतला.
या लोकअदालतमध्ये जिल्हाभरातून ४ हजार ५४ न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे आणि ४६ हजार २०४ वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. लोकअदालतीमध्ये ३५ हजार १८१ प्रकरणांमध्ये निवाडा होऊन वाद संपुष्टात आले. एकूण पंधरा कोटी एक लाख बारा हजार सहाशे बहात्तर रुपयांच्या रकमेची वसुली आणि वाद सामंजस्याने निर्णीत झाले. त्यामध्ये वकीलवर्ग व पक्षकार यांचा सहभाग होता. लोकअदालतीमध्ये पालिकेतील पाणीपट्टी व घरपट्टी प्रकरणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
लोकन्यायालयामध्ये अशा प्रकारचे निर्णय करताना पक्षकारांना न्यायप्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी होता येते. कोणतेही न्यायालयीन शुल्क दयावे लागत नाही. वकिल फी, न्यायालयात येण्या-जाण्याचा खर्च, अन्य खर्च आणि वेळेची बचत झाल्याचा आनंद पक्षकारांना चेहऱ्यावर दिसत होता. विशेष म्हणजे जिंकलो किंवा हरलो हा भाव पक्षकारांमध्ये राहिला नाही. आपल्यावर निर्णय लादला गेला ही भावनासुद्धा त्यांच्यामध्ये नव्हती. लोकअदालत ही लवचिक प्रक्रिया असून त्यावर पक्षकारांचे नियंत्रण असते. परिस्थितीला अनुसरून त्यामध्ये निवाडा घेता येतो. लोक न्यायालय यशस्वी होण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यालयातील सर्व कर्मचारी तसेच तालुका विधी सेवा समितीमधील सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:02 12-05-2025
