रत्नागिरी : इंग्लंडमधील कौंटी स्पर्धेत खेळण्यासाठी गेलेल्या रत्नागिरीच्या अविराज अनिल गावडे याने पहिल्याच कौंटी स्पर्धेच्या सामन्यात चमकदार कामगिरी केली. मिडलसेक्स संघाकडून खेळताना त्याने पदार्पणातील पहिल्याच सामन्यामध्ये मॅन ऑफ दि मॅचचा किताब पटकावून सगळ्यांचे आपल्याकडे लक्ष वेधले. मिडलसेक्स संघाचा युथ विंग संघाबरोबर सामना झाला.
यामध्ये मिडलसेक्स संघातून खेळताना अविराज याने ३४ बॉलमध्ये ४२ रन्स काढत गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्यामध्ये त्याचे ७ चौकार होते. तसेच त्याने गोलंदाजी करताना ९ ओव्हर्स टाकल्या. केवळ ३६ रन्स देवून दोन विकेट घेतल्या. अविराज याने क्षेत्ररक्षण करतानाही चमकदार कामगिरी केली. त्याने २ अप्रतीम झेल घेत आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची कामगिरी पार पाडली.
अविराज याच्या ऑलराऊंड परफॉर्मन्सचा विचार करत अविराज याला मॅन ऑफ दि मॅचचा किताब देण्यात आला. अविराज याच्या कामगिरीबद्दल मिडलसेक्स संघाच्या पदाधिकाऱ्यांनी अविराजच्या लेगस्पिन बॉलिंगचे विशेषतः गुगलीचे कौतूक केले. तसेच त्याच्या तंत्रशुद्ध बॅटींगचीही दखल घेतली. यामुळे यापुढील अनेक सामन्यातही अविराज चमकदार कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:28 PM 12/May/2025
