गणपतीपुळे : भारत-पाकिस्थानमधील युध्दजन्य स्थितीमुळे देशभरात दिलेला हायअलर्ट, उन्हाचा कडाका, अवेळी पडलेला पाऊस अशा कारणांमुळे कमी झालेला पर्यटकांचा ओघ सलग तीन दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे पुन्हा एकदा सुरू झाला आहे. मुंबई, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, नाशिक, गोवा, बेळगावमधील पर्यटक मोठ्याप्रमाणात गणपतीपुळेत दाखल झालेले आहेत. त्यामुळे खऱ्याअथनि उन्हाळी पर्यटनाला सुरवात झाली आहे. शनिवार, रविवारी, सोमवार तीन दिवसात सुमारे ७५ हजाराहून अधिक पर्यटकांची नोंद गणपतीपुळेत झाली आहे.
शाळेतील प्रवेश प्रक्रिया, बारावीचा लागलेला निकाल, भारत-पाक सिमेवरील युध्दजन्य परिस्थितीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीवर हजर राहण्याचे दिलेले आदेश यामुळे पर्यटकांकडून निवासासाठी पुढील आठवड्याचे बुकिंग सुरू आहे.
यावर्षी पर्यटन हंगाम वेळेत सुरू होईल की नाही अशी चिंता होती. मागील आठवड्यात महिना अखेरमुळे पर्यटकांची संख्याही कमी झाली होती. गणपपतीपुळे मंदिरात दिवसाला ८ ते १० हजार पर्यटकांची नोंद होती.
मात्र शनिवारी गणपतीपुळेत दिवसभरात २५ हजार पर्यटकांनी श्रींच्या दर्शनाला येऊन गेले. उशिरा का होईना पर्यटन हंगाम सुरू झाल्याचा आनंद गणपतीपुळेतील व्यावसायिकांच्या चेहऱ्यावर होता. या पर्यटकांमध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगावसह नाशिक, नागपूर, संभाजीनगर यासह मुंबई, पुण्यातील पर्यटकांचा समावेश आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा टक्का कमी असल्याने दिवसभरातील उलाढालीवर परिणाम होत आहे. त्याचा फटका व्यावसायिकांनाही काही प्रमाणात बसला आहे. मात्र गतवेळच्या तुलनेत ३० टक्के पर्यटक कमी झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
अवघ्या ४ तासांचाच व्यवसाय
उन्हाच्या कडाक्यामुळे गणपतीपुळेत आलेला पर्यटक फिरण्यासाठी किंवा साहसी क्रीडांचा आनंद घेण्यासाठी सकाळी आणि सायंकाळी प्रत्येकी दोन तास किनाऱ्यावर जात आहे. दुपारच्या उन्हात किनाऱ्यावर रपेट करणाऱ्या गाड्या, उंट व घोडागाडी या ग्राहकांच्या प्रतीक्षेत पाहायला मिळत आहेत. समुद्रातील नौका सफर, ड्रॅगन सफर, जेटस्की दुपारी किनाऱ्यावरच ठेवल्या जात आहेत. सायंकाळी साडेपाच वाजल्यानंतर साडेसातपर्यंत पर्यटक किनाऱ्यावर दाखल होत आहेत. त्यामुळे अवघ्या ४ तासात जो व्यावसाय होईल, त्यावरच व्यावसायिकांना समाधान मानावे लागत आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा कमी पर्यटक दाखल झालेले आहेत. त्यातही कडक उन्हामुळे किनाऱ्यावर दुपारच्या सुमारास पर्यटक कमी येतात. त्यामुळे अपेक्षित व्यवसाय होत नाही-किसन जाधव, व्यावसायिक, गणपतीपुळे
सध्याच्या हायअलर्टविषयी काही पर्यटक विचारणा करीत आहेत. प्रतिसाद चांगला मिळत असल्याने मे महिन्याचा पर्यटन हंगाम चांगला राहील- प्रमोद केळकर, गणपतीपुळे
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
1:01 PM 13/May/2025
