परशुराम घाटात सुरक्षिततेच्या उपाययोजनेचे काम युद्धपातळीवर..

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावर चौपदरीकरण अंतर्गत परशुराम घाटातील धोकादायक दरडीच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपल्याने काम पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु आहे. धोकादायक दरडीच्या ठिकाणी लोखंडी जाळी बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. तसेच दरडीच्या खालच्या बाजूने गॅबीयनवॉल उभारण्याचे काम १५ जूनपर्यंत सुरु ठेवले जाणार आहे. या कालावधीत हे काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण अनेक वर्षे रखडले असून विविध टप्प्यावर काम रखडली आहेत. त्यात परशुराम घाटातील धोकादायक स्थिती कायम चर्चेत राहिली आहे. या घाटात एका बाजूला २२ मीटर उंचीच्या दरडीचा भाग असल्याने या ठिकाणी पावसाळ्यात नियमित दुर्घटना घडत आहेत. याशिवाय घाटात काही ठिकाणी एकेरी वाहतूक सुरु असल्याने वाहनांच्या अपघाताचे प्रमाण कायम आहे, आता धोकादायक दरडीच्या ठिकाणी लोखंडी जाळी बसवली जात आहे. या कामामुळे रस्त्यावर येणारी माती आणि भलेमोठे दगडचा धोका काहीअंशी कमी होईल, लोखंडी जाळी बसवण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या काही हे पूर्णत्वास नेले जाईल. त्यासाठी जागोजागी खडकात व दरडीच्या भागात ८ ड्रिल मशीनच्या माध्यमातून लोखंडी सळ्या घुसवल्या जात आहेत आणि त्यावर जाळी बसवली जात आहे.

तसेच तीन महिन्यांपूर्वी परशुराम घाटात कोसळलेल्या संरक्षक भितीच्या बाजूने गॅबीयनवॉल उभारण्याचे काम देखील जोशात सुरू केले आहे. सुरुवातीला सिमेंट कॉक्रीटीकरणाचा पाया तयार करून त्यावर जाळीच्या सहाय्याने दगडी बांधकामाची रचना केली जाणार आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम मार्गी लावण्यासाठी महाडच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. उत्तराखंड येथील शासकीय कंपनीमार्फत लोखंडी जाळीचे काम केले जात आहे. गॅबीयन वॉलच्या माध्यमातून मजबुतीकरणाचे अर्धे काम पूर्ण झाले आहे. अजून काही दिवसांत हेही काम पूर्ण करून घाटातील दोन्ही मार्ग वाहतुकीस खुले केले जाणार आहेत.

पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याचा प्रयत्न
आता या कामाचा वेग आणखी वाढवला आहे. पावसाळ्यापूर्वी लोखंडी जाळी व गॅबीयनवॉल दोन्ही काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी या आठवड्यापासून काही प्रमाणात यंत्रणा वाढविण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे पंकज गोसावी यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:49 AM 17/May/2025