लांजा : गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या लांजा शहरातील कामाची पुरती दैना उडाल्याचे चित्र अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे दिसून येत आहे. अवकाळी पावसात जर ही परिस्थिती असेल तर पुढे पाऊस सुरू झाल्यावर लांजा शहराचे चित्र नेमके काय व कसे असेल? याची झलक अवकाळी पावसामुळे दिसून आली आहे.
लांजा शहरात मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरु असल्यामुळे लांजा शहर परिसराची पुरती दैना झाल्याचे चित्र दिसून येत आहे. महामार्गाच्या दुतर्फा सुरू असणाऱ्या सर्विस रोड आणि गटाराच्या अपूर्ण कामामुळे महामार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात चिखल पसरला असून त्यातून वाट काढणे हे पादचाऱ्यांसह दुचाकी सारख्या वाहनांना कसरत करावी लागत आहे.
लांजा साटवली फाटा ते कोर्ले तिठापर्यंत मुंबई-गोवा महामार्गाची पुरती दैना उडाली आहे. शहरात ठिकठिकाणी असलेले गटाराचे अपूर्ण काम तर काही ठिकाणी सुरू असलेले सर्व्हिस रोडचे काम यामुळे मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य निर्माण होत आहे. त्यात मुंबई-गोवा महामार्गावर वाढलेल्या वाहनांच्या वर्दळीमुळे शहरात भयानक परिस्थिती दिसून येत आहे. अवकाळी पावसातच ही परिस्थिती असेल तर पाऊस सुरू झाल्यास लांजा शहराची काय अवस्था होईल? यावरूनच याचा पुढील अंदाज लक्षात येतो.
अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या चिखलाच्या साम्राज्यातून वाट काढताना पादचारी वर्गासमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. अशातच सातत्याने लांजा साटवली फाटा ते बसस्थानकात दरम्यान वाहतूक कोंडीची समस्या वारंवार उद्भवत आहे.
एकूणच रस्त्याची अवस्था पाहता हा मुंबई-गोवा महामार्ग आहे की एखाद्या गावातील अथवा ग्रामीण भागातील रस्ता असा प्रश्न निर्माण झाला आहे. इतकी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:18 PM 16/May/2025












