दक्षिण कोरियाच्या लेखिका कांग यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार जाहीर

स्टॉकहोम : दक्षिण कोरियाच्या लेखिका हान कांग (वय ५३) यांना यावर्षीचा साहित्याचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला. ऐतिहासिक सत्याची आणि नाजूक मानवी जीवनाविषयी काव्यात्मक गद्यातून मांडणी केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती पुरस्कार समितीने दिली.

जीवनातील मार्मिक कथा त्यांनी सुंदर शैलीत सादर केल्या आहेत. कांग यांनी १९९३ पासून कविता लेखनास प्रारंभ केला. १९९५ मध्ये त्यांनी कथा लिहायला सुरुवात केली. नोबेल पारितोषिक जिंकणाऱ्या हान कांग या अठराव्या आणि पहिल्या कोरियन महिला आहेत. यापूर्वी २०१६ मध्ये ‘द व्हेजिटेरियन’ या कादंबरीसाठी त्यांना बुकर पारितोषिकही मिळाले होते. या कादंबरीने त्यांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून दिली. नोबेल समितीने हान कांग यांच्या ‘ग्रीक लेसन’ या कादंबरीवर विशेष चर्चा केली आहे. २०१८ साली हुमन अॅक्ट या त्यांच्या कादंबरीचीही बुकर पुरस्काराच्या अंतिम यादीत निवड झाली होती.

आतापर्यंत १७ महिलांना नोबेल
साहित्याचे नोबेल पुरस्कारांमधून महिला लेखिकांना डावलले जात असल्याची टीका समितीवर करण्यात येत होती. आतापर्यंत ११९ जणांना साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला असून, यामध्ये १७ महिला लेखिकांचा समावेश आहे. याआधी २०२२ साली अॅनी एरनॉक्स या फ्रान्सच्या लेखिकेस नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:21 PM 11/Oct/2024