रत्नागिरी : जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला

रत्नागिरी : अनंत चतुर्दशीला उघडीप घेतलेला पाऊस गुरूवारीही (ता.१९) गायब झाला आहे. त्यामुळे वातावणात उष्णता वाढली असून, कडकडीत उन्हामुळे नागरिकांना ऑक्टोबर हीट जाणवत आहे. पावसाने उघडीप घेतली असून पुढील आठवड्यात पावसाचा जोर वाढेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तापमान वाढल्यामुळे भातपिक करपण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कापणीयोग्य हळवी (कमी कालावधीत होणारी) भातशेती पुढील आठवड्यात पडणाऱ्या पावसाच्या तडाख्यात सापडण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

पिकपाहणी ऑनलाईन अहवालानुसार, यंदा जिल्ह्यात ४० हजार हेक्टर क्षेत्रावर भातलावण्या करण्यात आल्या आहेत. त्यातील सुमारे ३० टक्के क्षेत्रावर हळवी बियाण्यांची लागवड करण्यात आली आहे. ही बियाणी ९० ते १०० दिवसात तयार होतात. यंदा जून महिन्यात मोसमी पाऊस वेळेवर दाखल झाला असला तरीही पुढे काही काळ पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे पेरणी पाच ते सहा दिवस उशिराने झाल्या. त्याचा परिणाम भातलावण्यांवर झाला. त्यामुळे हळवी बियाण्यांची तशी थोडी उशिरानेच लागवड झाली आहे; परंतु जुलै, ऑगस्ट या कालावधीत समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकरी समाधानी आहे. सप्टेंबर महिन्यात पावसाचा जोर ओसरला असला तरीही अधुनमधून सरी पडत होत्या; मात्र अनंत चतुर्दशीपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. हळवी बियाण्यांची शेती कापणीयोग्य झालेली आहे. शेतकरी पावसाच्या विश्रांतीकडे लक्ष ठेवून आहेत; मात्र भातशेती कापणीयोग्य झाली असली तरीही पावसाने हजेरी लावल्यामुळे बळीराजा चिंताग्रस्त आहे. यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे उत्पादन अधिक येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, रत्नागिरी परिसरात गुरुवारी २९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दुपारी १२ वाजता ३० अंश सेल्सिअसवर गेले. जिल्ह्यात आज सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासात सरासरी १.०३ मि.मी. नोंद झाली आहे.

शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेऊन कापणी करावी. कापलेले भात सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करावी तसेच ज्या शेतकऱ्यांनी विमा उतरवलेला आहे त्यांचे भातपिक कापणीनंतर शेतात भिजले तर ७२ तासाच्या आत तत्काळ विमा कंपनी व कृषी विभागाशी संपर्क साधावा जेणेकरून तत्काळ कार्यवाही करता येईल. – विनोद हेगडे, तालुका कृषी अधिकारी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:19 20-09-2024