रत्नागिरी : चिपळूण शहरातील बाजारपेठेत प्लास्टिकचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर नगरपालिकेकडून दंडाची कारवाई करण्यास सुरुवात झाली असून तिघांकडून ४ हजार रुपये वसूल करण्यात आला आहे.
या कारवाईत १२ जणांना समज देण्यात आली आहे. तसेच सर्वांना सूचना देण्याचे कामही जोरात सुरू आहे. प्लास्टिकचे वाढते प्रमाण डोकेदुखी बनत असल्याने शासनाने प्लास्टिक निर्मूलनासाठी कडक धोरण अवलंबले आहे. पालिकेने शासनाच्या सूचनांची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यातूनच चार दिवसांपासून पहिल्या टप्प्यात आपल्या कार्यालयाचा परिसर प्लास्टिक निषिद्ध क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. एवढेच नव्हे तर व्यावसायिकांना प्लास्टिकचा वापर न करण्याच्या सूचना केल्या जात आहेत. यातूनच मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक सुजित जाधव, आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते, आदींच्या पथकाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
तीन व्यावसायिकांकडून ४ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला असून यापुढे प्लास्टिकचा वापर केल्याचे निदर्शनास आल्यास पहिल्या प्रसंगात ५ हजार, दुसऱ्यांदा १० हजार, तर तिसऱ्यांदा मिळून आल्यास २५ हजार रुपये व तीन महिने कारावास अशी शिक्षा केली जाणार असल्याचा इशारा देण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:05 09-06-2025












