रत्नागिरी : नाटककार प्र. ल. मयेकर स्मृती कथालेखन स्पर्धा

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील लेखकांच्या लेखनगुणांना वाव देण्यासाठी, महाराष्ट्र साहित्य परिषदेची रत्नागिरी शाखा आणि उदय सामंत प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने साहित्यिक आणि नाटककार प्रभाकर लक्ष्मण तथा प्र.ल. मयेकर स्मृती कथालेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धा मराठी कथा लेखनाची असून रत्नागिरी तालुका मर्यादित आहे. स्पर्धा महाविद्यालयीन गट (अकरावी ते पदव्युत्तर शिक्षण) आणि खुला गट अशा दोन गटांत घेण्यात येणार आहे. कथा मराठी भाषेत आणि स्वलिखित असावी, अनुवादित नसावी. कथा हाती लिहिलेली वा टाइप केलेली असावी, ती कागदाच्या एकाच बाजूस आणि सुवाच्च लिहिलेली असावी. कथेच्या शीर्षकासोबत कंसामध्ये कथा कोणत्या गटासाठी आहे (खुला/महाविद्यालयीन) ते लिहावे. कथा लिहिलेल्या पानांवर स्पर्धकांनी आपले नाव व पत्ता लिहू नये. स्पर्धकाने आपले नाव व पत्ता स्वतंत्र कागदावर लिहून तो कागद कथेच्या कागदांसोबत जोडावा. स्पर्धेसाठी पाठविलेल्या लेखनाबाबत काही तक्रार उद्भवल्यास त्याची जबाबदारी स्पर्धकावर राहील. कथेची शब्दसंख्या किमान ८०० शब्द आणि कमाल १५०० शब्द इतकी आहे.

स्पर्धेतील दोन्ही गटांमधील प्रथम क्रमांकासाठी २००० रुपये आणि सन्मानचिन्ह, द्वितीय १५०० रुपये आणि सन्मानचिन्ह आणि तृतीय १००० रुपये आणि सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ ५०० रुपये आणि सन्मानचिन्ह अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. प्रत्येक स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. बक्षिसाची घोषणा आणि बक्षीस समारंभाची तारीख व ठिकाण नंतर जाहीर करण्यात येईल.

स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या लेखकांनी कथा २५ जुलै २०२५ पर्यंत अ‍ॅड. श्रीकांत भाटवडेकर, बी २०३, यशोदा अपार्टमेंट, एकता मार्ग, मारुती मंदिर, रत्नागिरी या पत्त्यावर पोस्टाने पाठवायची आहे. अधिक माहितीसाठी संपर्क अनिल दांडेकर (९४२२९६५८४७) आणि मनोहर जोशी (९४०५७०१७६५) यांच्याशी संपर्क साधावा. रत्नागिरीमधील अधिकाधिक लेखकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाखाध्यक्ष अध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:53 17-06-2025