जाकादेवी : बुद्धवाद आणि मार्क्सवाद यांच्या विचारसरणीमध्ये तुलना केली तर खूप मोठा फरक असल्याचे समजून येते. मार्क्सवाद काय आहे हे आपल्याला, सर्वसामान्यांना अजूनतरी कळलेले नाही. बुद्ध व मार्क्सवाद समजून घेऊन त्यामागील कार्यकारणभाव डॉ. आंबेडकरी जनतेने समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. बुद्ध आणि आंबेडकरी विचारसरणीची माणसे ही चिकित्सक, अभ्यासू असून प्रज्ञा, शील, सम्यक मार्गाने चालणारी आहेत. म्हणूनच प्रज्ञा, शील, चिकित्सक आणि सम्यक विचाराने चालणारा माणूस हा जगात सक्षमपणे यशस्वी होतो, असा ठाम विश्वास जेएनयु युनिव्हर्सिटीचे जिज्ञासू विद्यार्थी, विचारवंत प्रा. डॉ. वृत्तांत मानवटकर यांनी रत्नागिरी येथे व्यक्त केला.
युवा परिषद रत्नागिरी यांच्या वतीने रत्नागिरी खेडशी एकदंत नगर येथील विपश्यना केंद्र येथे आयोजित एकदिवशीय युवा परिषदेत बुद्धा की कार्ल मार्क्स? या विषयावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. मानवटकर बोलत होते.
प्रा. डॉ. मानवटकर पुढे म्हणाले की, सध्याची राजकीय, समाजिक, धार्मिक परिस्थिती पाहता डॉ. आंबेडकरी चळवळीला एक प्रकारे डायवर्ड करण्याची सुप्त पद्धत अज्ञात शक्तीकडून सुरू आहे. त्यामुळे आंबेडकरी जनतेने सजग रहायला हवे, अशी अनेक ज्वलंत उदाहरण देत उपस्थित युवा व वयोवृद्ध नागरिकांच्या प्रश्नांचे निरसन केले.
याप्रसंगी परिषदेच्या विचार मंचावर रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष प्रकाश रामचंद्र पवार, निवृत्त गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, विपश्यना केंद्र पालीचे संतोष आयरे, संजय आयरे, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे संजय कांबळे, प्राध्यापक रविचंद्र कांबळे, विजय मोहिते सत्यशीला पवार, माजी उपनिबंधक रत्नागिरीचे गौतम कांबळे, प्रा. विशाखा पावसकर, नंदकुमार यादव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी युवा परिषद रत्नागिरीचे युवा नेतृत्व निहाल हातखंबेकर, विनोद पात्रोट, संदेश कांबळे, सौरभ आयरे, कल्पेश हातखंबेकर यांनी मेहनत घेतली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:55 PM 17/Jun/2025














