खेड : वेरळमध्ये शेतकरी सदानंद कदम यांना हवामान अनुकूल शेतीत यश

खेड : खेड तालुक्यातील वेरळ गावातील प्रगतिशील शेतकरी सदानंद कदम यांनी हवामान अनुकूल शेतीत यश मिळवत तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. तालुका कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने विविध झाडांची लागवड करून हवामान बदलाचा परिणाम कसा टाळता येतो वाचे जिवंत उदाहरण सादर केले आहे.

सदानंद कदम यांनी वापरलेल्या सीआर- तंत्रज्ञानामुळे त्यांच्या शेतीला स्थैर्य मिळाले असून उत्पादनातही लक्षणीय वाढ झाली आहे. बदलत्या हवामानातील आव्हानांना तोंड देत सातत्याने उत्पन्न घेण्याची ही पद्धत आता इतर शेतकऱ्यांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. शेती ही शास्त्रशुद्ध अभ्यासाची गोष्ट आहे. योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास यश हमखास मिळते, असा विश्वास कदम यांनी आपल्या यशातून दाखवून दिला आहे.

तालुका कृषी अधिकारी रवींद्र माळी यांनी कदम यांच्या शेतास भेट दिली असून, ही शेती हवामान अनुकूल शेतीचा आदर्श नमुना आहे. तालुक्यातील इतर शेतकऱ्यांनी येथे प्रत्यक्ष भेट देऊन अनुभव घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

तालुका कृषी विभागाने तालुक्यातील एकूण ४०० हेक्टर क्षेत्रावर शाश्वत शेतीचा विस्तार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. प्रत्येक गावात ४-५ हेक्टर क्षेत्रात अशी आधुनिक शेती रूजवण्याचा तालुका कृषी विभागाचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांना यासाठी चांगले प्रशिक्षण, तांत्रिक मार्गदर्शन आणि आवश्यक सल्ला मोफत दिला जात आहे.

पारंपरिक शेतीपद्धतीबरोबरच हवामान बदलाशी सुसंगत शेती ही आता काळाची गरज बनली असून वेरळ गावातून या नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचे चित्र आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:19 PM 18/Jun/2025