रत्नागिरीत पुढील २४ तासांत वादळी पावसाचा इशारा

रत्नागिरी : गेले पाच दिवस रात्रीच्या वेळी मुसळधार काेसळणाऱ्या पावसाने साेमवारी सायंकाळपासून थाेडीशी उसंत घेतली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मंगळवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतल्याने जगबुडी, अर्जुना व काेदवली या नद्यांची पाणीपातळीही कमी हाेऊन इशारा पातळीखाली आली आहे.

रविवारी रात्री काेसळलेल्या मुसळधार पावसामुळे जगबुडी, वाशिष्ठी, शास्त्री, सोनवी, काजळी, कोदवली, मुचकुंदी, बावनदी या नद्यांची पाणीपातळी वाढली हाेती. जगबुडी, अर्जुना व काेदवली या नद्यांचे पाणी इशारा पातळीच्या वर पाेहाेचले हाेते. त्यामुळे खेड आणि राजापूर येथील प्रशासन सतर्क झाले हाेते. राजापूर आणि संगमेश्वर तालुक्यात पूरसदृश स्थिती निर्माण झाली हाेती. शहरात पुराचे पाणी शिरल्याने व्यापारी धास्तावले हाेते. मात्र, दुपारनंतर पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर पुराचे पाणी ओसरले हाेते.

चिपळुणात सर्वाधिक पाऊस

जिल्ह्यात साेमवारी दिवसभरात एकूण ६१८.१६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मंडणगड तालुक्यात २५.५०, खेड ९१.५७, दापोली ६५.८५, चिपळूण १२२.४४, गुहागर ९०.८०, संगमेश्वर ९०.१६, रत्नागिरी २७.४४, लांजा ३५.४०, राजापूर तालुक्यात ६९ मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस चिपळूण तालुक्यात, तर सर्वांत कमी पाऊस रत्नागिरी तालुक्यात पडला आहे.

२४ तासांत वादळी पावसाचा इशारा

भारतीय हवामान खात्याकडून पुढील २४ तासांत जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जिल्ह्याला १९ जूनपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नदी किनारपट्टीलगतच्या ग्रामस्थांनी सतर्कता बाळगण्याची सूचना प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:02 18-06-2025