रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील महत्त्वाचे पर्यटनस्थळ असलेल्या मांडवी समुद्रकिनाऱ्यावर गेले महिना दोन महिने समुद्रातून येणारा कचरा साचत होता. याबाबत पर्यटक, स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली होती. याचे वृत्त प्रसिद्ध होताच याची दखल घेत नगरपालिकेने सोमवारी दिवसभर समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबवली. यामुळे मांडवी किनाऱ्याने मोकळा श्वास घेतला. या मोहिमेमुळे स्थानिक नागरिक व व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले.
मांडवी हे रत्नागिरीतील प्रमुख पर्यटनस्थळ असून, त्याला गेट वे ऑफ रत्नागिरी असे संबोधले जाते. त्यामुळे येथे हजारो पर्यटक येत असतात. या किनाऱ्याच्या स्वच्छतेची जबाबदारी एका कंपनीकडेही देण्यात आली होती. परंतु, गेले सहा महिने या किनाऱ्यावर स्वच्छता करण्यात आली नसल्याचे स्थानिकांनी सांगितले. तसेच भरतीच्या वेळेस येणाऱ्या पाण्यासोबत भरपूर कचरा दररोज येत असतो. यात प्लास्टिक कचऱ्यासह घरगुती वापरातील अनेक वस्तू, झाडांच्या फांद्या, काटेकुटे असा विविध प्रकारांचा कचरा येतो. हा स्वच्छ न केल्यामुळे पर्यटकही पाठ फिरवू लागले आहेत.
सकाळपासून जेसीबी, ट्रॅक्टर आणि पालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांनी मांडवी किनाऱ्यावर स्वच्छतेला सुरुवात केली. जवळपास दहा ट्रॅक्टर भरून हा कचरा संकलित करण्यात आला आहे. यामुळे किनाऱ्याने आज मोकळा श्वास घेतला. स्वच्छता मोहिमेसाठी नगरपालिकेतील अधिकारी यतिराज जाधव, जितू विचारे, श्री. कांबळे यांनीही विशेष लक्ष देऊन काम करून घेतले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:07 AM 02/Jul/2025














