लांजा : राज्यातील एक हजार महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र उपक्रमाचा शुभारंभ कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा येथून २० सप्टेंबर रोजी ऑनलाईन पद्धतीने पार पडला. या शुभारंभाचे दूरदृश्य प्रणाली व लांजा महाविद्यालयातील कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन लांजा येथे पार पडले.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० मध्ये व्यावसायिक शिक्षणाला महत्त्व आलेले आहे. या धोरणाच्या अंमलबजावणी अंतर्गत ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र’ ही नावीन्यपूर्ण योजना सुरु केली आहे. एक हजार नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात येणार आहे.
या कौशल्य विकास केंद्रात प्रतिवर्षी साधारण १५० युवक युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामुळे संपूर्ण राज्यात १५ ते ४५ वयोगटातील दरवर्षी साधारण १ लाख ५० हजार युवक-युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण मिळणार आहे. विद्यार्थ्यांना देण्यात येणारे प्रशिक्षण संपूर्णपणे मोफत असून या योजनेसाठीचा सर्व खर्च कौशल्य विकास विभाग करणार आहे.
लांजा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी वर्धा येथे शुभारंभ पार पडला. या शुभारंभाचे दूरदृश्य प्रणालीद्वारे लांजा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कार्यक्रम पार पडला.
या प्रसंगी लांजा महाविद्यालयात येथे लांजा तहसीलदार प्रियांका ढोले, गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जयवंतभाऊ शेट्ये, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम वंजारे, न्यू एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष सुनील कुरूप, प्राचार्य डॉ. के आर चव्हाण, समन्वयक डॉ. कल्पित म्हात्रे, अॅड. अभिजित जेधे, राजेश शेट्ये, महेश सप्रे, प्रा. महेश बावधनकार व प्राध्यापकवर्ग, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.