संगमेश्वर : अश्विन महिन्यात तयार होणारे नवीन भात, नाचणी, वरी या पिकांतील एक लॉब अथवा कणीस, कुई, झेंडू या फुलांसमवेत आंब्याच्या पानात गुंडाळून ते देव्हाऱ्यासह घरातील विविध ठिकाणी लावण्याला नवं बांधणे म्हणतात. हे सर्व नवान्न पौर्णिमेदिवशी केले जाते. ही पौर्णिमा (ता. १७) जिल्ह्यात सर्वत्र उत्साहात साजरी होणार आहे. कितीही आधुनिकता आली तरीही कोकणच्या विविध भागांत घरी नवं बांधण्याची जुनी परंपरा आजही उत्साहात पार पाडली जाते. त्यासाठी आवश्यक साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी आहे.
प्रत्येक नवीन वस्तूंचे सर्वानांच मोठे कौतुक असते. कोकणात केली जाणारी शेती ही पावसावर अवलंबून असते. आश्विन महिन्यात ही शेती कापणीयोग्य होते. शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेल्या पूर्वीच्या धान्यात या नव्या धान्याची भर पडते आणि सुष्टीचे बहराचे कालचक्र असेच अविरत सुरू राहते. नवान्न पौर्णिमेला नवीन धान्याचा वापर भोजनात केला जातो. नवं बांधण्याची एक आगळीवेगळी परंपरा कोकणात आहे. त्यामध्ये शुभ मानल्या जाणाऱ्या आंब्याच्या पानात भाताची लोंब, वरी, नाचणीचं कणीस, गोंडा आणि कुईचं फूल एकत्रित करून ते घराच्या प्रवेशद्वारासह महत्वाच्या ठिकाणी बांधण्याची पद्धत आहे. नव्याची बांबूच्या कामट्यांमध्ये केली जाणारी तोरणं तर ग्रामीण भागातील कसबी कलाकारांच कौशल्य दाखवून देतात. नवं बांधणं कौशल्याच काम मानलं तरी ती पूर्वजांची संकल्पना आहे.
नवीन धान्य घरामध्ये नव्याच्या रूपानं बांधून निसर्गदेवतेसह येणाऱ्या प्रत्येकाचं भरभरून स्वागत कराव, हाच त्यामागील खरा हेतू असल्याचे ग्रामीण भागातील लोकं सांगतात, आज नवान्न पौर्णिमा जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठांमध्ये फुलं, फळं यांसह विविध साहित्य खरेदीसाठी गर्दी झालेली आहे. सध्या शहरी भागामध्ये तयार केलेली नवं घरामध्ये बांधली जातात. रत्नागिरीसह प्रमुख शहरात ग्रामीण भागातील अनेक महिला ही नवी विक्रीसाठी आलेल्या आहेत.
निसर्गाचा आनंदोत्सव
नवान्न पौर्णिमा हा सण गेली वर्षानुवर्षे निसर्गाचा आनंदोत्सव म्हणूनच साजरा केला जातो. निसर्गाला होणारा आनंद म्हणजेच मानवाच्या हाती काहीतरी नवं लागणं. सर्वाधिक पाऊस पडूनही भौगोलिक परिस्थितीमुळे कोकण उन्हाळ्यात कोरडा पडतो. परिणामी, अपवाद वगळता शेती ओसाड पडलेली असते. त्यामुळे बहुतांश शेती ही पावसाळ्यातच बहरते. भात, वरी, नाचणी, खामडी, तीळ अशा प्रकारची शेती कोकणात पूर्वी केली जात होती. भात आणि अन्य धान्य बहरली की, सारं नवं नवं भासते. त्याच नव्याची अपूर्वाई म्हणजे नवान्न पौर्णिमा हा निसर्गाच्या आनंदाचा उत्सव म्हटला जातो.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 AM 17/Oct/2024
