खेड : भोस्ते घाटात सापडलेल्या मृतदेहाच्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. ज्या योगेश आर्याला भोस्ते घाटात मृतदेह असल्याचं स्वप्न पडलं होतं त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. एवढंच नाही तर जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी स्वत: योगेश आर्याची चौकशी केली आहे. तसेच पोलीस अधिक्षकांनी घटनास्थळी जाऊनही भेट घेतली आहे.
पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि श्वान पथकानेही ज्या ठिकाणी मृतदेह आढळून आला तिथली पाहणी केली आहे. खेड पोलीस ठाण्यात योगेश आर्याची चौकशी सुरू आहे. खेड पोलीस ठाण्यात जिल्हा पोलीस अधीक्षक तसंच इतर वरिष्ठ अधिकारीही उपस्थित आहेत.
दोन दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या भोस्ते घाटात एक मृतदेह आढळला होता. योगेश आर्या नावाच्या सावंतवाडीच्या तरुणाच्या स्वप्नात भोस्ते घाटात मृतदेह असल्याचं येत होतं. याची फिर्याद योगेश आर्याने पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली, तेव्हा तिथे खरंच मृतदेह आढळला. या घटनेमुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली होती.
योगेश आर्याचा व्हिडिओ
भोस्ते घाटाच्या पायथ्याशी असणाऱ्या वेरळ येथील ग्रामस्थांनी योगेशपासूनच चौकशी सुरू करावी आणि या मृतदेहाचे गूढ उकलावे, अशी मागणी केली आहे. योगेश आर्याने सोशल मीडियावर टाकलेले व्हिडिओ आता व्हायरल होत आहेत. खेडमध्ये त्याने डोंगराळ भाग कसा शोधला? कोणत्या व्यक्तीकडून माहिती घेतली हा व्हिडिओदेखील त्याने इन्स्टाग्रामवर टाकला आहे.
योगेश आर्या याने आपल्या स्वप्नात भोस्ते घाटात मृतदेह असल्याचं वारंवार येत असल्याची फिर्याद पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनीही त्या ठिकाणी जाऊन तपास केला असता त्यांना कुजलेल्या अवस्थेतला मृतदेह आढळला होता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 21-09-2024