मुंबई-गोवा महामार्गाच्या अनधिकृत बोअर ब्लास्टिंगला विरोध; वांद्री, उक्षीत भिंतींना तडे

संगमेश्वर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वांद्री येथे महामार्गाच्या कामासाठी बोअर ब्लास्टिंग सुरू आहे. यामुळे वांद्री तसेच उक्षी गावातील जनतेला त्रास सहन करावा लागत असून, दोन्ही गावातील घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. बोअर ब्लास्टिंग हे अनधिकृतपणे केले जात आहे, असा आरोप केला जात असून, ते त्वरित थांबवण्यात यावे अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा वांद्री, उक्षी ग्रामस्थांनी दिला आहे. तसे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहे.

बावनदी ते आरवली सुमारे ३६ कि. मी. महामार्ग रस्त्याचे काम केले जात आहे. काम करत असताना जनतेच्या सुरक्षेची कोणतीच काळजी घेतली जात नसल्याचा आरोप नेहमीच केला जात आहे. सुरक्षेचा अभाव अनेकदा अपघाताला कारण ठरत आहे. लोकांच्या घरांनासुद्धा त्याचा मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे. बोअर ब्लास्टच्या हादऱ्यामुळे व आवाजामुळे वांद्री तसेच नदीपलीकडे असलेला उक्षी गावाचा परिसर हादरून जात आहे तसेच घराच्या भिंतींना तडे जाणे, घरावरील कौले तुटून पडणे, घराच्या भिंतींचे सिमेंट प्लास्टर गळून पडणे, घरांना हादरे बसणे असे प्रकार सुरू आहेत.

१८३ मीटरची सर्वसाधारण मर्यादा असताना त्याच्या पलीकडे जाऊन बोअर ब्लास्टिंग केले जाते. महसूल विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप निवेदनावर स्वाक्षरी करणाऱ्या वांद्री तसेच उक्षी ग्रामस्थांनी केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:34 AM 31/Jul/2025