श्री रत्नागिरीचा राजाच्या आगमनाचे वेध; गणेश भक्त मुंबईकडे रवाना!

रत्नागिरी : सर्व गणेश भक्तांचे श्रद्धास्थान आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री रत्नागिरीचा राजा याच्या आगमनाचे वेध रत्नागिरीकरांना लागले आहेत. यंदाच्या गणेशोत्सवासाठी गणरायाची मूर्ती आणण्याकरिता आज गणेश मंडळाचे सदस्य नव्या गाडीसह मोठ्या उत्साहात मुंबईकडे रवाना झाले.

यावेळी, गणपती बाप्पाच्या प्रवासाचा शुभारंभ श्रीफळ वाढवून करण्यात आला. या मंगलप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, माजी उपनगराध्यक्ष राजन शेट्ये, शिवसेना शहरप्रमुख बिपिन बंदरकर, माजी नगरसेवक सुदेश मयेकर, निमेश नायर यांच्यासह मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते. या सर्वांनी मंडळाला शुभेच्छा दिल्या आणि गणरायाचे आगमन सुरक्षित पार पडावे यासाठी प्रार्थना केली.

भव्य आगमन मिरवणूक

श्री रत्नागिरीचा राजाची भव्य आगमन मिरवणूक रविवार, दिनांक ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता सुरू होणार आहे. ही मिरवणूक साळवी स्टॉप येथून सुरू होऊन शहराच्या प्रमुख मार्गांवरून काढण्यात येणार आहे. मोठ्या संख्येने गणेश भक्तांनी या मिरवणुकीत सहभागी होऊन आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत करावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

श्री रत्नागिरीचा राजा हे केवळ एक दैवत नसून, रत्नागिरी शहराची एक ओळख आहे. दरवर्षी येथील गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि गणरायाच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत शहरात एक वेगळेच चैतन्य आणि भक्तीमय वातावरण निर्माण होते. यंदाही हा उत्साह शिगेला पोहोचलेला दिसत आहे.