रत्नागिरी : गोगटे- जोगळेकर महाविद्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे जनजागृती

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे शहरातील गोगटे जोगळेकर महाविद्यालयात जनजागृती अभियान राबवण्यात आले. याला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, पोलीस हवालदार संजय वाघाटे व हेमंत पवार यांनी महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत असणाऱ्या कार्यालयांमध्ये भ्रष्टाचार होत असेल तर त्याविरुद्ध तक्रार करणे, त्यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करणे याबाबत माहिती दिली.

याबाबत अधिक माहिती सांगताना मच्छिंद्र जाधव यांनी लाच घेण्याचा प्रयत्न झाला असेल तर लगेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे त्याप्रमाणे माहिती देऊन तक्रार नोंदवणे आणि खात्याने पुरविलेल्या व्हॉईस रेकॉर्डिंग डिव्हाईसचा वापर करून संबंधित व्यक्तीवर कारवाई करणे त्याचबरोबर तक्रारदाराने स्वतः केलेले रेकॉर्डिंग हा दुय्यम पुरावा मानला जातो असे स्पष्ट केले. तसेच शासकीय व निमशासकीय कर्मचारी, अधिकारी आपल्या हक्काचे काम करण्यासाठी लाच मागत असतील तर तक्रार नोंदवण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक, ई-मेल आयडी यांचीही माहिती विद्यार्थ्यांना दिली.

अध्यक्षीय महाविद्यालयाच्या भाषणात वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्या मेजर डॉ. सीमा कदम यांनी विद्यार्थ्यांना सुजाण नागरिक बनण्यासाठी महाविद्यालयीन जीवनातच मूल्ये जोपासली पाहिजेत असे सांगितले.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभागी होत आपल्या मनातील शंकांचे निरसन करण्यासाठी प्रश्न विचारले व त्या प्रश्नांची योग्य ती उत्तरे देऊन प्राथमिक पुराव्यांबाबत माहिती देताना मच्छिंद्र जाधव यांनी सर्व विद्यार्थ्यांना ही माहिती लक्षात घेऊन अशाप्रकारे होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी नागरिकांमध्ये जागृतता येणे महत्त्वाचे आहे, असे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन महाविद्यालयातील प्रा. डॉ. आनंद आंबेकर यांनी केले. सदर कार्यक्रमाला बहुसंख्येने विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:54 PM 12/Aug/2025