रत्नागिरी आयटीआयमध्ये २० ऑगस्टपर्यंत फेरअर्ज करण्याचे आवाहन

रत्नागिरी : येथील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आय.टी.आय. प्रवेशाच्या चौथ्या फेरीनंतर रिक्त राहिलेल्या जागांसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत केंद्रीय समुपदेशन फेरी आयोजित करण्यात आलेली आहे.

त्यासाठी २० ऑगस्टपर्यंत नव्याने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ज्यांनी रत्नागिरी आय.टी.आय.मध्ये अर्ज भरलेले आहेत व कोणत्याही व्यवसायात प्रवेश घेतलेला नाही, तसेच ज्या उमेदवारांनी अद्याप ऑनलाइन अर्ज केलेले नाहीत, अशा उमेदवारांनी २० ऑगस्ट २०२५ पर्यंत नव्याने अर्ज करावेत, असे आवाहन शासकीय लोकमान्य बाळ गंगाधर टिळक औद्योगिक प्रशिक्षण संस्थचे प्राचार्यानी केले आहे. असे सर्व उमेदवार समुपदेशन फेरीकरिता पात्र असतील.

आय टी आय प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक https://admission.dvet.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आले आहे

नोंदणीकृत तथा अप्रवेशित उमेदवारांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उपलब्ध असलेल्या व्यवसायनिहाय रिक्त जागांचा अभ्यास करून संस्थास्तरीय समुपदेशन फेरीसाठी आपल्या प्रवेश खात्यात प्रवेश लॉगिन करून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत समुपदेशन फेरीकरिता २२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजल्यापासून २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर २५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता उमेदवाराने निवड केलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत व्यक्तिशः संपूर्ण मूळ कागदपत्रे, सर्व छायांकित प्रती, आधार कार्ड, अलीकडील पासपोर्ट आकाराचे फोटो व प्रशिक्षण शुल्कासहित वेबसाइटवर दिलेल्या शुल्कानुसार उपस्थित राहणे आवश्यक आहे. या प्रवेश फेरीकरिता उमेदवारांच्या गुणवत्ता क्रमांकानुसार व प्रवेशाकरिता उपलब्ध जागांनुसार प्रवेशाच्या जागांचे वाटप करण्यात येईल.

प्रवेश प्रक्रियेच्या माहितीकरिता गटनिदेशक सी. आर. शिंदे (९९६७७७५३१७), पी. जी. कांबळे (९४२३८७६८८३), शिल्पनिदेशक एस. जे. पावसकर (८४२१९७९६६३) यांच्याशी संपर्क साधावा.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:01 12-08-2025