दापोली : बंदी असूनही एलईडी नौका आणि १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंतच परवानगी असलेल्या पर्ससीन जाळ्यांच्या नौकांनी थेट समुद्रात उतरण्यास सुरुवात केली आहे. या एलईडी व पर्ससीन मासेमारी नौकांच्या अवैध मासेमारीविरोधात रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांतील पारंपरिक मच्छीमारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. नुकतीच दापोली तालुक्यातील उटंबर येथील राधाकृष्ण मंदिरात या विषयावर बैठक झाली.
१ ऑगस्टपासून सुरू झालेल्या मासेमारी हंगामाच्या सुरुवातीलाच मासळीची आवक अत्यल्प आहे. त्यात बंदी असूनही एलईडी नौका आणि १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंतच परवानगी असलेल्या पर्ससीन जाळ्यांच्या नौकांनी थेट समुद्रात उतरण्यास सुरुवात केली आहे. रायगडातील श्रीवर्धनसह काही बंदरांवर सरकारी अधिकाऱ्यांसमोरच या नौकांची तयारी सुरू असून, विरोधाचा अभाव असल्याचे पारंपरिक मच्छीमारांचे म्हणणे आहे.
मच्छीमार संघटनांनी मागील काही वर्षांत आंदोलने, निवेदने व पाठपुरावा करूनही शासनाकडून ठोस कारवाई न झाल्याचा आरोप करण्यात आला. शासनाने डोळेझाक केल्याने या बेकायदेशीर पद्धतींना अभय मिळाल्याचा आरोपही करण्यात आला. तसेच या मासेमारीविरोधात कायदा पारीत करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर मासेमारी थांबवावी व दोर्षीवर कारवाई करावी, या मागणीसाठी रायगड व रत्नागिरीतील पारंपरिक मच्छीमार एकत्र आले असून, त्यांनी उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
कोकण किनारपट्टीवर मत्स्य दुष्काळ
या बेकायदेशीर मासेमारीमुळे गेल्या ५-६ वर्षांपासून कोकण किनारपट्टीवर मत्स्य दुष्काळ निर्माण झाला आहे. परिणामी, सध्या सुमारे ८० टक्के पारंपरिक नौका बंदरात व खाड्यांमध्ये नांगरून ठेवलेल्या आहेत. उदरनिर्वाहावर गदा येऊन तरुणपिढीत या व्यवसायाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:48 AM 13/Aug/2025














