रानफुलांच्या सौंदर्याने कोकणातील कातळ बहरले !

संगमेश्वर : श्रावण महिन्यात कातळावर निसर्गदेवतेकडून फुलवली जाणारी रंगीबेरंगी फुलांची बाग मानवी हातांना आव्हानात्मक आहे. श्रावण महिन्यात सुरू होणारा रानफुलांचा हंगाम पुढे अश्विन महिन्यापर्यंत कायम असतो. हे तीन मराठी महिने हिंदू संस्कृतीत व्रतवैकल्ये आणि विविध सणांचे म्हणून ओळखले जातात.

श्रावणात सुरू असणाऱ्या ऊन-पावसाच्या खेळामुळे पडणारे इंद्रधनुष्य, त्याच्या जोडीने डोंगररांगांमधून दाटून येणारे दाट धुके त्यातूनच अवचितपणे पडणारे सोनेरी ऊन, अशा निसर्गाच्या मुक्त उधळणीत सह्याद्रीच्या कुशीपासून थेट समुद्रकिनारपट्टीच्या विविध भागांतील कातळ परिसर विविधांगी रंगीबेरंगी फुलांनी खुलला आहे. एरवी काळा तुळतुळीत, काहीसा भेसूर आणि कोरडा दिसणारा कातळ परिसर सध्या आकर्षक फुलांनी श्रावणसरींमध्ये असा काही खुलून गेला आहे की, पाहणाऱ्यांच्या नजरेचे पारणे फिटावे असे चित्र सर्वत्र आहे. कातळावरील डबकी आणि परिसरामध्ये सहा-सात इंच उंचीच्या इवल्याशा रोपट्यांवर फुललेल्या फुलांनी खुललेले निसर्गसौंदर्य मनात साठवण्यासाठी पर्यटकांची पावले तिकडे वळलेली आहेत.

ऊन-पावसाच्या खेळासोबत श्रावण महिन्यात कोकणचे निसर्गसौंदर्य नटलेले आहे. ठिकठिकाणी उंचावून कोसळणारे धबधबे आणि त्याच्या जोडीने निसर्गाने पांघरलेली हिरवी शाल नजरेचे पारणे फेडते. गेल्या काही दिवसांपासून कातळपरिसर रंगीबेरंगी फुलांनी साजशृंगार केल्यासारखा सजलेला आहे. निळ्या, जांभळ्या, पांढऱ्या रंगांच्या या फुलांचे सौंदर्यही चांगले खुलले आहे. माळरानांवरील ही रानफुले अभ्यासकांना सुवर्णसंधीच आहे. त्यातील असंख्य फुलांचे अजूनही नामकरण झालेले नाही.

बहरलेली रानफुले
कोकणच्या माळरानावर सध्या सीतेची वेणी, द्रौपदीची वेणी, सोनवेल, कर्तृल, सोनतळ, शेरवड, कुडा, कोरंटी, गायरी, गोविळ, गांधारी, कोंडानी, भेंद्री, हळुदा, तेरडा, दूधवेल, नावळी, हरणतोंडी, कळलावी, रानहळद, कवळा, घाणेरी, रानमोडी, कोसमोस, कारवी (ही ९ वर्षातून एकदा फुलते.) डिकेमाळी, टोपली, सोनकी, गवळण, कुमुदिनी, गंधारी, अग्निशिखा यांसह अनेक प्रकारची रानफुले बहरलेली पाहायला मिळत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:01 PM 13/Aug/2025