पोलीस दलाच्या वतीने “हर घर तिरंगा रॅली” आणि “अमली पदार्थ मुक्त रत्नागिरी दौड” उत्साहात

रत्नागिरी : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलीस दलाच्या वतीने “हर घर तिरंगा रॅली” आणि “अमली पदार्थ मुक्त रत्नागिरी दौड” मोठ्या उत्साहात पार पडली. १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ ते ५ या वेळेत पोलीस मुख्यालय ते मारुती मंदिर आणि पुन्हा पोलीस मुख्यालय असा तिरंगा रॅलीचा मार्ग होता. विशेष पोलीस महानिरीक्षक (कोंकण परिक्षेत्र) श्री. सुंजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली आयोजित करण्यात आली होती. पोलीस अधीक्षक नितीन भाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, राखीव पोलीस निरीक्षक राजेंद्र काळसुंदरे तसेच ७० पोलीस कर्मचारी या रॅलीत सहभागी झाले. “हर घर तिरंगा, घर घर तिरंगा” हा संदेश देण्यात आला.

१३ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता ५ किमी अंतराची “अमली पदार्थ मुक्त रत्नागिरी दौड” घेण्यात आली. या उपक्रमात पोलीस विभागातील अधिकारी-कर्मचारी, लायन्स क्लब, रत्नागिरी सायकलिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी, प्रशिक्षक आणि सुमारे २०० पोलीस कर्मचारी सहभागी झाले. दौडीचा मार्ग पोलीस मुख्यालय जयस्तंभ भाट्ये समुद्र किनारा झरी व्यायाम मंदिर – भाट्ये जयस्तंभ पोलीस मुख्यालय असा होता.

भाट्ये समुद्रकिनारी स्वच्छता मोहीमही राबविण्यात आली. विशेषतः प्लास्टिक कचरा गोळा करून किनारा स्वच्छ करण्यात आला. या प्रसंगी पोलीस अधीक्षक नितीन भाटे यांनी नागरिकांना आणि पालकांना अमली पदार्थांपासून दूर राहण्याचे आवाहन केले तसेच “फिट इंडिया मूव्हमेंट “मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.

“हर घर तिरंगा, हर घर स्वच्छताः स्वातंत्र्याचा उत्सव, स्वच्छतेचे संकल्प” आणि “Say No to Drugs” या घोषवाक्यांसह हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला.

Tata nexon

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:57 PM 13/Aug/2025