स्वातंत्र्यदिनी रत्नागिरीत रानभाजी महोत्सव

रत्नागिरी : कोकणात मोठ्या प्रमाणात रानभाज्या आढळतात. शहरातील नागरिकांना रानभाज्यांची ओळख व्हावी, रानभाजी खाल्ल्याने काय आरोग्याचे फायदे होतात, रानभाज्यातून पाककृतींची माहिती व्हावी म्हणून येत्या १५ ऑगस्ट स्वातंत्रदिनी रत्नागिरी शहरातील टीआरपी येथील अंबर हॉल येथे सकाळी १० रानभाजी महोत्सव, पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी दिली. जास्तीत जास्त शेतकरी, महिलांनी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले.

महाराष्ट्र शासन कृषी विभाग, प्रकल्प संचालक आत्मा, रोटरी क्लब रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या रानभाजी महोत्सवाचे उदघाटन जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते होणार आहे. तसेच विविध अधिकारी, तालुक्यातील आमदार उपस्थित राहणार आहेत.

यावेळी सिंधुरत्न समृद्ध योजनेमधून शेतकऱ्यांना वाहनांचे अनुदान वितरण, जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी यांच्यासाठी आयात निर्यात कार्यशाळा, खरेदीवर व विक्रेता संमेलन या नाविन्यपूर्ण आणि उपयुक्त उपक्रम शेतकरी बंधू व भगिनीसाठी राबवण्यात येणार आहे.

पाककला स्पर्धेसाठी हर्षला पाटील, नेहा पवार यांच्याशी संपर्क साधावा. या संमेलनाचा आंबा, काजू बागायतदारांनी व प्रक्रियाधारकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आत्मा प्रकल्प संचालक विजय बेतिवार, कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.

Khabardar diwali fest

या रानभाज्या असणार
या रानभाजी महोत्सवात मारंगी, दिंडा, कुरडू, केना, कुडाच्या शेंगा, आघाडा, टाकळा, आंबाडी, पानाचा ओवा, कपाळफोडी, लाजाळू, अळू, हळदीची पाने, शेवगा, पिंपळ, बांबू, सुरण, करटोली, मटारू, माठ, चिवळ, घोळभाजी, भुई, आवाळा, कवठ, केळफूल यासह विविध रानभाज्या पहावयास मिळणार आहे. तसेच रानभाज्यांच्या विक्रीतून बळीराजाला आर्थिक फायदा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त रानभाज्या खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:23 AM 14/Aug/2025