मंडणगड : सार्वजनिक बांधकाम विभागाचा आणि संबंधित ठेकेदाराचा भोंगळ कारभार मंडणगड तालुक्यातील बाणकोट बौद्धवाडी येथे उघडकीस आला आहे. रस्त्याच्या कामासाठी कार्यादेश (Work Order) देऊन नऊ महिने उलटले, तरी काम अर्धवट ठेवण्यात आले. जे काही काम करण्यात आले, ते इतके निकृष्ट दर्जाचे होते की, मे आणि जून महिन्यातील पहिल्याच पावसात रस्त्याची अक्षरशः धुळधाण उडाली आहे. या गंभीर समस्येमुळे संतप्त झालेले मुंबईस्थित चाकरमानी श्री. दिनेश बाळकृष्ण पवार यांनी थेट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर करून ठेकेदारावर कारवाईची मागणी केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, बाणकोट बौद्धवाडी रस्ता (ग्रामा ७२, किमी ०/००० ते ०/४००) तयार करण्याचे काम चिपळूण येथील श्री. गणेश कन्स्ट्रक्शन यांना २० सप्टेंबर २०२४ रोजी देण्यात आले होते. मात्र, ठेकेदाराने तब्बल सात महिन्यांच्या दिरंगाईनंतर एप्रिल २०२५ मध्ये कामाला सुरुवात केली आणि तेही अर्धवट सोडून दिले.
या अर्धवट आणि निकृष्ट कामाचे पितळ पहिल्याच पावसाने उघडे पाडले. झालेल्या पावसात रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, काही ठिकाणी तर रस्ता वाहून गेला आहे. यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत. केवळ नवीन रस्ताच नाही, तर वाडीकडे जाणाऱ्या अस्तित्वातील पायवाटांचीही दुर्दशा झाली असून, त्यावरून ये-जा करणेही ग्रामस्थांसाठी अत्यंत धोकादायक आणि अवघड झाले आहे.
या गंभीर परिस्थितीबाबत श्री. पवार यांनी बांधकाम विभागाच्या चिपळूण आणि मंडणगड येथील अधिकाऱ्यांना रस्त्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हॉट्सॲपवर पाठवून वेळोवेळी माहिती दिली होती. मात्र, कोणतीही दखल न घेतल्याने अखेर त्यांनी २४ जून २०२५ रोजी लेखी निवेदन सादर केले. या निवेदनाद्वारे, संबंधित ठेकेदार संस्थेवर तातडीने कारवाई करावी आणि कामाच्या मुदतीबाबत (जी पावसाळा धरून एक वर्षाची आहे) स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आणि ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे बौद्धवाडीतील ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या निवेदनानंतर तरी सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागा होणार का आणि पावसाळा अधिक जोर धरण्याआधी ग्रामस्थांना दिलासा मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











