हातखंबा परिसरात दुकाने जलमय

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा परिसरात मंगळवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यालगतची दुकाने अक्षरशः जलमय झाल्याचे चित्र आहे. येथील गटारांची वेळेवर साफसफाई न झाल्याने पावसाचे पाणी थेट दुकानांमध्ये शिरले. त्यामुळे स्थानिक व्यापारी व दुकानदारांचे मोठे नुकसान झाले, महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार कंपनी ‘इंगल’ विरोधात नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

येथील रस्त्यावरील माती आणि वाळू गटारांमध्ये साचून गटार पूर्णतः चोकअप झाले आहेत. अशातच पावसाचा जोर अचानक वाढल्याने साचलेले पाणी बाहेर पडण्याचा मार्ग न मिळाल्याने ते थेट दुकानांमध्ये घुसत आहे. दुकानदारांनी पावसाचे पाणी बाहेर काढण्याचा सकाळपासून उपक्रमच हाती घेतला आहे. महामार्गावर काम करताना व नंतर देखभाल करताना अशा घटनांचा विचारच होत नसल्याचे पाहायला मिळत आहे. या भागात काम करणाऱ्या कंपनीला शहाणपणा कधी येणार? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. या भोंगळ कारभाराबाबत ठेकेदार कंपनीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

मंत्री आल्यावरच ‘हजेरी’, बाकी वेळी अधिकारी गायब

मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा परिसरातील पावसामुळे जलमय झालेल्या दुकानांच्या घटनेने पुन्हा एकदा महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी मंत्री किंवा वरिष्ठांची पाहणी दौरा ठरल्यावरच ‘हजेरी’ लावतात. त्यानंतर मात्र महामार्गावर फिरकत सुद्धा नसल्याचे चित्र आहे. यामुळेच गटार मोकळी न करणे, रस्त्यावर माती-वाळू साचणे असा समस्या निर्माण होत आहे.

एकूणच, ठेकेदार कंपनीचा मनमानी पद्धतीने सुरू असलेला कारभारावर कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. कामाच्या ठिकाणी ना नियमित पाहणी, ना वेळेवर देखभाल, यावरून अधिकाऱ्यांवर कोणताही अंकुश राहिलेला नसल्याने ठेकेदार कंपन्याही वेजबाबदारपणे काम करत असल्याचे दिसून येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 AM 15/Aug/2025