रत्नागिरी, १८ ऑगस्ट: भारतीय हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी उद्या, दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील पूरस्थितीची शक्यता आणि अतिमुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेता, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने हा आदेश आज (१८ ऑगस्ट २०२५) जारी केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार, जिल्ह्यात उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी आधीच मुसळधार पाऊस सुरू असून, खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. याशिवाय, संगमेश्वर येथील शास्त्री नदी आणि राजापूर येथील कोदवली नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. या गंभीर परिस्थितीमुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि आपत्कालीन परिस्थितीचा परिणाम विद्यार्थ्यांवर होऊ नये, या हेतूने हा निर्णय घेण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.
यांना लागू असेल सुट्टी: जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार, मंगळवार, दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व-प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळा, महाविद्यालये, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, सरकारी व खाजगी, अनुदानित व विनाअनुदानित शाळा तसेच सर्व आश्रमशाळा आणि व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
हा आदेश निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या सहीने जारी करण्यात आला आहे.











