पाचल : दोन सख्ख्या भावांच्या कौटुंबिक वादातून एका भावाने दुसऱ्याच्या पोटात सुरीने भोसकून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी दुपारी राजापूर तालुक्यातील काजीर्डा राणेवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी राजापूर पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी काजीर्डा राणेवाडी येथील बाळकृष्ण आत्माराम राणे (72) आणि त्यांचा सख्खा भाऊ शांताराम आत्माराम राणे (56) यांच्यात शुक्रवारी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास कौटुंबिक कारणावरून वाद सुरू झाला. हा वाद इतका शिगेला पोहोचला की बाळकृष्ण राणे यांनी रागाच्या भरात आपल्या सख्ख्या भावाला सुरीने भोसकून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये शांताराम राणे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आला आहे. याप्रकरणी काजीर्डा गावचे पोलीस पाटील रामचंद्र चंद्रकांत अर्डे (वय 30) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाळकृष्ण राणे यांच्यावर भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 चे कलम 109 प्रमाणे राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास राजापूर पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे आणि त्यांची टीम करीत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:13 21-09-2024