देशासमोर कोणतेही संकट नाही; ‘विकसित भारत संकल्प समावेश’ कार्यक्रमात केंद्रीय अर्थमंत्र्यांचे प्रतिपादन
बंगळुरू: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याच्या नादात राहुल गांधी थेट भारत देश आणि येथील जनतेच्या ऐतिहासिक उपलब्धतींनाच (यशाला) कमी लेखत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. बंगळुरू येथे आयोजित ‘विकसित भारत संकल्प समावेश’ कार्यक्रमात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना त्या बोलत होत्या.
राहुल गांधींकडून देशावर मोठे संकट असल्याचा खोटा प्रचार
आपल्या भाषणात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाच्या सद्यस्थितीवर भाष्य करताना विरोधकांच्या आरोपांना चोख उत्तर दिले. “राहुल गांधी सतत सगळे काही कोलमडणार आहे आणि देशावर मोठे संकट येणार आहे, असा खोटा प्रचार करत आहेत; मात्र वास्तवात देशासमोर असे कोणतेही संकट नाही,” असे सीतारमण यांनी स्पष्ट केले. राजकीय हेतूने प्रेरित होऊन देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी आपल्या वक्तव्यातून अधोरेखित केले.
Nirmala Sitharaman News: जागतिक आव्हानांनंतरही देशाची पुरवठा साखळी मजबूत
जागतिक पातळीवरील आर्थिक आणि राजकीय परिस्थितीचा दाखला देत अर्थमंत्र्यांनी मोदी सरकारच्या कामगिरीचे कौतुक केले. पश्चिम आशियातील संघर्ष आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध आव्हानांमुळे सध्या कच्च्या तेलाचे दर आणि मालवाहतूक विमा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. असे असूनही, मोदी सरकारने देशांतर्गत पुरवठा साखळीवर आणि अर्थव्यवस्थेवर त्याचा कोणताही विपरीत परिणाम होऊ दिलेला नाही, याकडे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.
भारत ही जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी देशाच्या आर्थिक प्रगतीची आकडेवारी मांडत राहुल गांधींचे दावे फेटाळून लावले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि देशाचे जीडीपी (GDP) आकडे हेच सिद्ध करतात की, भारत ही सध्या जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. त्यामुळे नकारात्मकता पसरवण्याऐवजी देशाच्या या ऐतिहासिक आर्थिक प्रवासाचा अभिमान असायला हवा, असा टोला त्यांनी लगावला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:19 15-06-2026














