Ratnagiri Crime News : रत्नागिरीचा ‘सिरीयल किलर’? प्रेयसीच्या खुनानंतर प्रियकर दुर्वास पाटीलच्या दुसऱ्या हत्याकांडाचा पर्दाफाश!

Ratnagiri Crime News: रत्नागिरीतील मिरजोळे येथील तरुणी भक्ती मयेकर हिच्या निर्घृण खून प्रकरणाने संपूर्ण जिल्हा हादरलेला असताना, या प्रकरणातील मुख्य संशयित आणि तिचा प्रियकर असलेल्या दुर्वास पाटील याचा आणखी एक अंगावर शहारे आणणारा कारनामा पोलीस तपासात उघड झाला आहे. त्याने वर्षभरापूर्वी आपल्या बारमधील एका कामगाराचा खून करून त्याचाही मृतदेह आंबा घाटात फेकून दिल्याची धक्कादायक कबुली दिली आहे. या दुसऱ्या खून प्रकरणामुळे रत्नागिरीत खळबळ उडाली असून, आरोपीच्या क्रूर मानसिकतेचे थरारक पैलू समोर येत आहेत.


काय आहे भक्ती मयेकर खून प्रकरण? (Bhakti Mayekar Murder Case Details)

रत्नागिरी शहराजवळील मिरजोळे येथील रहिवासी भक्ती मयेकर या तरुणीचे आणि खंडाळा येथील बार मालक दुर्वास दर्शन पाटील (वय २५) याचे गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, भक्ती गरोदर राहिल्याने तिने दुर्वासकडे लग्नाचा हट्ट धरला होता. मात्र, लग्न करण्यास तयार नसलेल्या दुर्वासने आपल्या मार्गातील अडथळा दूर करण्यासाठी तिचा खून करण्याचा कट रचला.

१६ ऑगस्ट रोजी त्याने तिचा खून करून तिचा मृतदेह आंबा घाटात गायमुख जवळील दरीत फेकून दिला. धक्कादायक म्हणजे, हा गुन्हा लपवण्यासाठी त्याने दुसऱ्याच मुलीशी साखरपुडा देखील केला होता. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी मुख्य संशयित दुर्वास पाटीलसह त्याचे दोन साथीदार विश्वास विजय पवार (वय ४१) आणि सुशांत शांताराम नरळकर (वय ४०) यांना अटक केली आहे.


असा अडकला खुनी पोलिसांच्या जाळ्यात

भक्तीचा खून केल्यानंतर संशय आपल्यावर येऊ नये, यासाठी दुर्वासने एक बनाव रचला. त्याने भक्तीच्याच मोबाईलवरून ‘मी घरी पोहोचले आहे’ असा मेसेज स्वतःच्या मोबाईलवर करून घेतला. मात्र, तांत्रिक तपासात पोलिसांना दोन्ही मोबाईलचे लोकेशन एकाच ठिकाणी असल्याचे आढळून आले. यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी दुर्वासला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.


थरारक शोधमोहीम आणि सडलेल्या अवस्थेत मृतदेह

उपविभागीय पोलीस अधीक्षक निलेश माईनकर आणि पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी आरोपी दुर्वासला सोबत घेऊन आंबा घाटात मृतदेहाचा शोध सुरू केला. दाट धुके आणि मुसळधार पावसात पोलिसांनी तब्बल साठ फूट खोल दरीत उतरून शोधमोहीम राबवली. अखेर १२ दिवसांनंतर भक्तीचा मृतदेह झाडीत सडलेल्या आणि छिन्नविछिन्न अवस्थेत सापडला. चेहरा पूर्णपणे सडलेला असल्याने केवळ कवटी शिल्लक होती.


तपासातील दुसरा धक्कादायक खुलासा: आणखी एका खुनाची कबुली

भक्ती मयेकर खून प्रकरणाचा तपास सुरू असतानाच दुर्वास पाटीलने पोलिसांना आणखी एक धक्कादायक माहिती दिली. मूळचा कोल्हापूरचा असलेल्या दुर्वासचे रत्नागिरीतील खंडाळा येथे बार आणि दारूचे दुकान आहे. त्याने वर्षभरापूर्वी आपल्या बारमध्ये काम करणाऱ्या एका कामगाराचा खून करून, त्याचाही मृतदेह आंबा घाटातच फेकून दिला होता.

या दुसऱ्या खून प्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पथक त्या कामगाराच्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी आंबा घाटात रवाना झाले आहे.


आरोपीला ८ दिवसांची पोलीस कोठडी

एकापाठोपाठ एक दोन खून केल्याचे उघड झाल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. मुख्य संशयित दुर्वास पाटील याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला ८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या दुहेरी हत्याकांडामुळे रत्नागिरी जिल्ह्यात भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.