Chiplun : गणेशोत्सवाच्या काळात वारंवार वीजपुरवठा खंडित

चिपळूण : गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वीज खंडित समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गौरी गणपती गणेशोत्सवाच्या काळात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांचा संयम सुटू लागला असून, संतापाची लाट उसळली आहे. दिवसा आणि रात्री वीज जात आहे. त्यामुळे २४ तास अखंडित वीज देण्याची घोषणा केवळ गप्पा ठरली आहे.

गेली सहा महिन्यापासून शहर व परिसरात सतत वीजपुरवठा खंडित होत आहे. चिपळूण वीज वितरण कंपनीचे कर्मचारी वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर नागरिक चौकशीसाठी फोन करतात, मात्र ते फोन महावितरणचे कर्मचारी उचलत नाहीत. तसेच पावसाळ्याचे दिवस असल्याने या कार्यालयात विशेषतः रात्रीच्या सुमारास कर्मचारी उपस्थित नसतात. प्रामीण भागातही हा त्रास जाणवत आहे. ग्रामीण भागातील उपकेंद्रात कार्यरत असलेले अधिकारी मुख्यालयाच्या ठिकाणी न राहता ते चिपळूण येथे राहतात, तसेच चिपळूण वीज कार्यालयातील काही कर्मचारी हंगामी म्हणून काम करतात. त्यामुळे त्यांनाही काम करताना मर्यादा पडतात, त्यामुळे रात्री अपरात्री वीजपुरवठा खंडित झाल्यास चिपळूण येथील कर्मचाऱ्यांना वा समस्येला तोंड द्यावे लागते. नागरिकांनी या कर्मचाऱ्याकडे चौकशी करण्यासाठी फोन केल्यानंतर त्यांच्यासोबत कार्यरत असलेले वायरमनही फोनवर प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे नागरिकांना समस्येची कारणे किंवा दुरुस्तीची माहिती वेळेवर मिळत नाही.

शहर व परिसरात विजेचा बिघाड झाल्यास दुरुस्तीसाठी तातडीने कार्यवाही होत नाही. त्यामुळे रात्रभर नागरिकांना अंधारात राहावे लागते. शहरातील छोटे-मोठे व्यावसायिक विजेच्या लपंडावामुळे हैराण झाले आहेत. अनेक ग्राहकांच्या घरातील इन्व्हटर, टीव्ही, एलईडी बल्ब, ट्यूब, फ्रीज, तसेच विजेवर चालणारी उपकरणात बिघाड झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

महावितरणच्या यंत्रणेची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी वर्षाला कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. पावसाळ्यात आगाऊ निविदा केली जाते. कंत्राटी कामगारांची नियुक्ती केली जाते. विजेचे साहित्य मागवले जातात. त्यानंतरही वीजपुरवठा सुरळीत होत नाही मग हा खर्च नेमका कशावर होतो? असा प्रश्न आहे-शाहनवाज शाह, सामाजिक कार्यकर्ते, चिपळूण

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:58 PM 02-Sep-2025