◼️ उद्योगमंत्री उदय सामंत यांची विशेष उपस्थिती
◼️ आयोजक कांचन मालगुंडकर यांची माहिती
रत्नागिरी (प्रतिनिधी)- रत्नागिरीतील प्रसिद्ध फोटोग्राफर कांचन मालगुंडकर आयोजित “कांचन डिजिटल घरगुती गणपती सजावट स्पर्धा” यंदाही गणेशभक्तांच्या अलोट प्रतिसादात पार पडली. या स्पर्धेचा दिमाखदार पारितोषिक वितरण सोहळा शनिवार दिनांक 13 रोजी सायंकाळी 4 ते 6 यावेळेत जयेश मंगल पार्क-माळनाका येथे संपन्न होणार आहे. विशेष म्हणजे या सोहळ्याला उद्योगमंत्री उदय सामंत यांची उपस्थिती लाभणार असल्याची माहिती कांचन यांनी दिली आहे.
कांचन डिजिटल घरगुती गणपती सजावट स्पर्धेची लोकप्रियता प्रतिवर्षी वाढत जात आहे. यंदाही या स्पर्धेत स्पर्धकांची वाढलेली संख्या याचे प्रमाण आहे. यंदाही परीक्षकांची दोन पथके करून स्पर्धेचे तालुकाभर परीक्षण करावे लागले. तर रत्नागिरी तालुक्याबाहेरही स्पर्धेची लोकप्रियता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. रत्नागिरी तालुक्या बाहेरूनही या स्पर्धेत गणेशभक्तांनी आग्रहाने सहभाग नोंदवला. त्यांना न डावलता त्यातून “कांचन डिजिटल तालुकाबाह्य घरगुती गणपती ऑनलाईन सजावट स्पर्धा” अशी स्वतंत्र कॅटेगरी करण्याचा निर्णय कांचन मालगुंडकर यांनी करून त्यांना योग्य तो न्याय त्यांनी दिला.
या स्पर्धेचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे ह्या स्पर्धेचे परीक्षण गणेशोत्सवाच्या पहिल्या दोन दिवसांतच करून गणेशोत्सवातच या स्पर्धेचा निकाल त्वरित जाहीर करण्यात येतो. त्यामुळे सहभागी स्पर्धकांना पारितोषिक प्राप्त झाल्यावर गणेशोत्सवाच्या आनंदातच आपल्या विजयाचा आनंद अनुभवता येतो आणि आपल्याला बाप्पा पावल्याचे समाधान मिळते. त्यामुळे लोकप्रिय ठरलेली ही स्पर्धा उत्तम परीक्षणाने, उत्तम दर्जेदार आयोजनाने व सर्व भाविकांच्या भक्तीभावाने ही स्पर्धा परिपूर्ण आहे.
या स्पर्धेचा मुख्य उद्देश सर्वांना एकत्रित आणणे, गणेभक्तांना दरवर्षी नवनवीन कल्पक देखावे, सजावट करण्याची प्रेरणा देण्याचा आहे. यासाठी गेली 6 वर्षे एक सच्चा गणेशभक्त म्हणून कांचन मालगुंडकर हेही स्पर्धा आयोजित करत आहेत. या स्पर्धेचा दिमाखदार पारितोषिक वितरण सोहळा 13 रोजी संपन्न होणार असून पारितोषिक प्राप्त विजेते, गणेशभक्तांनी बहुसंख्येने या पारितोषिक वितरण सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक कांचन मालगुंडकर यांनी केले आहे.
पारितोषिक वितरण सोहळ्याला खास कार्यक्रम
स्पर्धेच्या दिमाखदार पारितोषिक वितरण सोहळ्याला रत्नागिरीतील प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. याचबरोबर “मंगळागौर” ह्या खास सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. तसेच रत्नागिरीतील कला शिक्षकांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:11 11-09-2025













