उदय सामंत प्रतिष्ठान आयोजित स्मार्ट सखी मधील विजेता मोर्येच्या शिरपेचात मानाचा तुरा; पटकावला “द रॉयल क्वीन ऑफ इंडिया २०२५” किताब!

रत्नागिरी : रत्नागिरी शहराची सुकन्या आणि रत्नागिरी येथे झालेल्या उदय सामंत प्रतिष्ठान आयोजित स्मार्ट सखी स्पर्धेत चमकदार कामगिरी केलेली, विजेता विजय मोर्ये (पूर्वाश्रमीची अंकिता अरविंद चौघुले) हिने सौंदर्य आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर रत्नागिरी जिल्ह्याचा झेंडा रोवला आहे. पुण्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या अत्यंत प्रतिष्ठेच्या “द रॉयल क्वीन ऑफ इंडिया २०२५” या राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत तिने विजेतेपदावर आपले नाव कोरले. यासोबतच, “मी होणार महाराष्ट्र सौंदर्यवती – सिझलिंग क्वीन २०२५” या राज्यस्तरीय स्पर्धेतही तिने प्रथम क्रमांकाचा मुकुट पटकावून दुहेरी यश संपादन केले आहे. एकंदर रत्नागिरीत नुकतीच पार पडलेली उदय सामंत प्रतिष्ठान आयोजित स्मार्ट सखी स्पर्धा हि अनेक महिलांना आत्मविश्वास देणारी स्पर्धा ठरली आहे.

द रॉयल ग्रुपच्या वतीने आयोजित या राष्ट्रीय स्पर्धेतील विजयानंतर विजेताच्या डोक्यावर मलेशियाहून खास तयार करवलेला, तब्बल ४५ हजार रुपये किमतीचा ‘रॉयल क्राऊन’ चढवण्यात आला. हा मुकुट केवळ तिच्या सौंदर्याचाच नव्हे, तर तिच्या अथक परिश्रमाचे, आत्मविश्वासाचे आणि तिला मिळालेल्या भक्कम पाठिंब्याचे प्रतीक ठरला आहे.

महाविद्यालयीन स्पर्धांपासून राष्ट्रीय मंचापर्यंतचा प्रवास

विजेता मोर्येच्या या यशाची पायाभरणी रत्नागिरीतूनच झाली. नवनिर्माण कॉलेजमधील ‘मिस कॉन्टेस्ट’ पासून सुरू झालेला तिचा प्रवास बहर युवा महोत्सव, लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी आयोजित ‘मिस रत्नागिरी’, मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्रातील स्पर्धा, आणि व्यावसायिक समाजकार्य पदव्युत्तर पदवी (MSW) कॉलेज आयोजित ‘उत्कर्ष क्वीन २०१८’ व ‘मिस जल्लोष २०१९’ अशा अनेक स्पर्धांमधून अधिक आत्मविश्वासू बनला. लग्नानंतरही तिने आपली आवड जोपासत उदय सामंत प्रतिष्ठान आयोजित ‘स्मार्ट श्रावण सखी २०२५’ मध्ये द्वितीय उपविजेतेपद (सेकंड रनरअप) मिळवले होते. याच अनुभवांच्या शिदोरीवर तिने आज राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे.

यशाचे श्रेय आणि स्थानिक प्रतिभेचा गौरव

या दैदिप्यमान यशाचे श्रेय देताना विजेता मोर्ये भावूक झाली. तिने आपले पती विजय मोर्ये, आई, भाऊ तुषार, वहिनी कावेरी, भाची लिरा यांच्यासह पुण्यातील नणंद-परिवार (मांडवकर), सासर आणि माहेरच्या सर्व नातेवाईकांचे, मित्र-मैत्रिणींचे, हितचिंतकांचे आणि गुरूजनांचे आभार मानले. तसेच, द रॉयल ग्रुपचे संचालक नितीन झगरे, स्पर्धेचे आयोजक, कोरिओग्राफर आणि ग्रूमर यांचेही तिने विशेष आभार मानले.

या प्रवासात एक विशेष बाब म्हणजे, स्पर्धेसाठी लागणारी आकर्षक आणि अनोखी वेशभूषा रत्नागिरीतील तरुण फॅशन डिझायनर प्रियांका तोसकर (Handmade Collection) यांनी तयार केली होती. स्थानिक प्रतिभेला सोबत घेऊन मिळवलेले हे यश अधिकच खास ठरले आहे.

संधींची नवी दारे

“द रॉयल क्वीन ऑफ इंडिया २०२५” या किताबाने विजेतासाठी मनोरंजन आणि फॅशन जगताची दारे खुली केली आहेत. तिला मानाचा बिग क्राऊन, ट्रॉफी, गोल्डन सॅश, प्रमाणपत्र, मेडल आणि मानपत्रासोबतच अनेक व्यावसायिक संधी मिळाल्या आहेत. यामध्ये विविध ब्रँड्ससाठी ॲड शूट, चित्रपट, मालिकांमध्ये कामाची संधी, मॅगझिन शूट, आणि संपूर्ण महाराष्ट्रात होर्डिंग व स्टँडीवर झळकण्याची संधी यांचा समावेश आहे. तसेच, तिला वर्षभर ब्रँडिंग आणि विविध कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले जाणार आहे.

एका गृहिणीपासून ते राष्ट्रीय स्तरावरील सौंदर्यवती बनण्यापर्यंतचा विजेता मोर्येचा प्रवास हा अनेक महिलांसाठी प्रेरणादायी असून, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कोणतंही शिखर गाठता येतं, हेच तिने सिद्ध करून दाखवले आहे.