Swasth Nari, Sashakt Parivar Abhiyan : जिल्ह्यात आजपासून ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान’

रत्नागिरी : केंद्र व राज्य शासनाच्या सहकायनि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान’ राबविण्यात येणार आहे. या विशेष उपक्रमांतर्गत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यातील महिलांची मोफत आरोग्य तपासणी, उपचार व आवश्यक समुपदेशन सेवा दिल्या जाणार आहेत. या अभियानाचे जिल्हास्तरीय उद्घाटन १७ सप्टेंबर रोजी जिल्हा रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय कामथे येथे होणार आहे.

सर्व नागरिकांनी आपल्या घरातील महिला व मातांना या शिबिराचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी केले आहे.

या अभियानांतर्गत जिल्हा रुग्णालयासह ३ उपजिल्हा रुग्णालये, ९ ग्रामीण रुग्णालये, ६८ प्राथमिक आरोग्य केंद्रे व ३७८ उपकेंद्रांमध्ये मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. या उपक्रमामुळे महिलांना आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण होईल, गंभीर आजारांचे लवकर निदान होऊन वेळेत उपचार घेता येतील.

स्तन व गर्भाशय कर्करोगाची तपासणी, रक्तदाब व मधुमेह तपासणी, हिमोग्लोबिन चाचणी, क्षयरोग तपासणी, किशोरवयीन मुलींसाठी अशक्तपणा तपासणी, गर्भवतींसाठी प्रसूतपूर्व काळजी तपासणी, माता-बाल संरक्षण कार्डचे वितरण, लसीकरण सेवा, मासिक पाळी स्वच्छता जनजागृती आणि रक्तदान मोहीम अशा विविध आरोग्य सेवा या अभियानाचा भाग असतील. तसेच महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेसाठी आधारकार्ड, रेशनकार्ड व आधारशी लिंक असलेला मोबाईल आवश्यक असून, आयुष्यमान भारत वंदना कार्डसाठीदेखील त्याच कागदपत्रांची आवश्यकता आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 AM 17/Sep/2025