रत्नागिरी : खानवली (ता. लांजा) येथे अमेरिकेत सापडणारे फुलपाखरू सापडले आहे. खानवली बेनी येथे दुर्मिळ असे हे पोपटी रंगाचे परीप्रमाणे दिसणारे अमेरिकन फुलपाखरू आहे. सामजिक कार्यकर्ते वैभव वारिसे यांनी या फुलपाखराचे चित्र आपल्या मोबाइलमध्ये टिपले. विशेषतः अमेरिकेच्या उत्तर भागात हे फुलपाखरू सर्वसाधारणपणे आढळते. यापूर्वी हातिवले कॉलेजच्या प्राध्यापकांना अँक्टीनास ल्युना हे फुलपाखरू राजापूरमध्ये आढळून आले होते. त्यामुळे निसर्गप्रेमींमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. या फुलपाखराच्या पंखाची रचना परीप्रमाणे आहे. पंखांचा रंग फिकट पोपटी आहे. हे फुलपाखरू भारतात क्वचित आढळते. याच्या पंखावर चंद्रासारखे गोल आकार आहेत. ते कलेकलेने वाढत जाऊन तो पूर्णचंद्र होतो. यापूर्वी आसाममध्ये २०१० सालात सोनेरी जंगलात या जातीचे फुलपाखरू आढळून आले होते, अशी माहिती अभ्यासकांनी दिली. राजापूर तालुक्यातही गेल्या काही वर्षांपासून दुर्मिळ फुलपाखरू आढळून येत आहेत. यात माऊल मॉथ, मनू मॉथ, सिल्क मॉथ आणि ॲटलास या दुर्मिळ फुलपाखरांच्या प्रजाती आढळून आल्या होत्या. आता यात आणखी एका अमेरिकन दुर्मिळ फुलपाखराची भर पडली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:18 21-09-2024