चिपळूण : श्रीगुरुमंदिर नागपूर प्रणीत ‘पत्रभेट’ ह्या मासिकाच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन शनिवार दिनांक ११ ऑक्टोबर २०२५ रोजी ब्राह्मण सहाय्यक संघाच्या सभागृहात सायंकाळी ५.३० ते ८ ह्या वेळेत संपन्न होणार आहे. दत्त संप्रदायातील श्री. टेंबे स्वार्मीच्या परंपरेतील थोर संत श्री. विष्णुदास महाराज यांचे हे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे. आकेरी, सावंतवाडी येथे त्यांचा १९०१ साली जन्म झाला होता. पत्रभेट मासिकाचे सुद्धा हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. ह्याचे औचित्य साधून हा ‘भार्गवभूमी’ दिवाळी विशेषांक प्रकाशन सोहळा कोकणात आयोजित केला आहे. सौ. अपूर्वा मार्डीकर, नागपूर योनी हा दिवाळी अंक संपादित केला आहे. गेली २५ वर्षे धर्म, संस्कृती आणि अध्यात्म विषयक विविधांगी साहित्यनिर्मिती करणारे पत्रभेट हे महाराष्ट्रातील एक अग्रगण्य मासिक आहे. पत्रभेट हे सदगुरूंचे वाङमयीन रुप आहे. आपल्या सदगुरुंची भेट घडविणारी ही मासिक पत्रिका आहे.
गेल्या सलग तीन वर्षापासून ‘पत्रभेट’ मासिकाला पुण्याच्या मराठबोली संस्थेचे अग्रमानांकित पुरस्कार मिळाले आहेत. तसेच वर्ल्ड vision संस्थेचा २०२४ चा मधुरंग होरायझन दीपोत्सव पुरस्कार प्राप्त झाला आहे.
दत्त संप्रदायातील अधिकारी सत्पुरुष, ज्येष्ठ इतिहासकार, संशोधक धर्मभास्कर श्री. सद्गुरुदास महाराज, नागपूर ह्या सोहळ्यासाठी विशेष उपस्थित राहणार आहेत. श्री. वासुदेवानंद सरस्वती माणगाव संस्थानचे माजी अध्यक्ष श्री. रामचंद्र गणपत्ये हे अध्यक्ष स्थानी राहणार असून चिपळूण येथील संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक श्री. धनंजय चितळे आणि ज्येष्ठ संपादक, लेखक, कवी आणि साहित्यिक श्री. प्रकाश देशपांडे हे प्रमुख पाहणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ह्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून श्रीगुरुमंदिर परिवाराचे अनेक उपासक उपस्थित राहणार आहेत.
तरी चिपळूण आणि परिसरातील साहित्यप्रेमी आणि गुरुभक्त भाविकांनी ह्या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन पत्रभेटच्या मुख्य संपादक सौ. प्रज्ञा फडणीस आणि श्री विष्णुदास महाराज अध्यात्मसाधना केंद्र, चिपळूणच्या केंद्रप्रमुख सौ. अर्चना बक्षी यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:45 07-10-2025














