रत्नागिरी शहरातील १९२ होर्डिंग मजबूत आणि सुरक्षित

रत्नागिरी : मुंबईतील घाटकोपर इथे होर्डिंग कोसळून १४ जणांचा मृत्यू होऊन अनेकजण जखमी झाल्याची मोठी दुर्घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पालिकेने आपल्या हद्दीतील १९२ अधिकृत होर्डिंगच्या संबंधित मालकांना तत्काळ स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे फर्मान काढले होते. त्यानुसार सर्वच मालकांचा अहवाल प्राप्त झाला असून शहरातील होर्डिंग मजबूत आणि सुरक्षित असल्याचे पालिका मालमत्ता विभागाने सांगितले.

वादळ किंवा अन्य आपत्ती घडून अशा प्रकारचे होर्डिंग किंवा कुठलेही बांधकाम पाडू शकते. त्यामुळे त्याबाबत राज्यभर उपाययोजना करण्याच्या सूचना आपत्कालीन विभागाचे प्रमुख आणि मुख्य सचिवांना दिल्या आहेत. रत्नागिरी शहरातही अलीकडे नाक्यानाक्यांवर होर्डिंग उभे राहत आहेत. या संदर्भात पालिका प्रशासनाकडून माहिती घेतली. शहरात १९२ होर्डिंग उभारण्यात आली आहेत. त्या उभारणाच्या परवानगीसाठी संबधितानी प्रक्रिया पूर्ण करून घेतली आहे. त्यामुळे कुठेही अनधिकृत होर्डिंग नसल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले; पण पावसाळ्यापूर्वी या सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याचे आदेश संबंधित मालकांना पालिका प्रशासनाकडून देण्यात आले होते तसेच धोकादायक होर्डिंग असेल तर तातडीने काढण्याची सक्त ताकीद देण्यात आली होती. पालिकेच्या नोटिसीनंतर शहरातील सर्व होर्डिंग मालकांनी स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतले आहे. ज्या ठिकाणी दुरुस्तीची गरज होती ती दुरुस्ती करून घेऊन तसा अहवाल पालिका मालमत्ता विभागाला दिला आहे. त्यामुळे शहरातील १९२ होर्डिंग मजबूत आणि सुरक्षित असल्याचे पालिकेने सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:27 PM 23/Sep/2024

📰➖♾️➖♾️➖♾️➖📰