पावस : अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आणि सततच्या पाठपुराव्यानंतर अखेर तालुक्यातील कुर्धे येथील खांब तळ्याच्या संवर्धनाला व सुशोभीकरणाला प्रारंभ करण्यात आला आहे. या इतिहासकालीन तळ्यातील गाळ काढल्यानंतर तळे मोकळा श्वास घेणार आहे.
कुर्धे येथील सड्यावरती गेली कित्येक वर्षे हे तळे खांब तळे म्हणून प्रचलित आहे. मेअखेरसुद्धा हा संपूर्ण परिसर कातळमय असूनही याठिकाणी पाण्याचा मुबलक साठा असतो. अनेक वर्षे हे तळे साफ न केल्यामुळे मोठ्याप्रमाणात गाळ साठवून झालेला आहे. यासंदर्भात अनेक वर्षे ग्रामस्थांतर्फे पाठपुरावा केला जात आहे. तसेच ग्रामसभेत ठराव करून त्याचे संवर्धन करावे, अशा मागणीचे पत्र संबंधित खात्याला देण्यात आले होते. या परिसरात सध्या वस्ती मोठ्याप्रमाणात वाढत असल्याने पाण्याची समस्या दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पालकमंत्री उदय सामंत यांनी या तळ्याच्या संवर्धनाकरिता दीड कोटीचा निधी मंजूर केला होता. सध्या इतिहासकालीन तळे संरक्षित करण्याच्या दृष्टिकोनातून या तळ्याच्या परिसरात संरक्षक भिंत बांधणीच्या दृष्टिकोनातून बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे या तळ्याचा मूळ गाभा तसाच ठेवून मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ काढून तळ्याचे संवर्धन केले जाणार आहे.
यादृष्टिकोनातून काम युद्धपातळीवर सुरू आहे. यासंदर्भात ग्रामस्थ अजय भिडे म्हणाले की, हे तळे फार जुने आहे पाण्याची स्त्रोत चांगल्या प्रकारे आहेत. यासाठी मी आणि सामाजिक कार्यकर्ते हेमंत अभ्यंकर सातत्याने पाठपुरावा करत होतो. या तलावातील गाळ काढून तलावाचा मूळ गाभा तसाच ठेवून त्याचे संवर्धन करण्यात येणार आहे. त्यामुळे या तलावामध्ये पाण्याचे स्रोत बळकट होण्यास मदत होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर












